INDvsENG : शानदार विजय! ओव्हल कसोटीत भारताने इंग्रजांना लोळवलं

ओव्हल कसोटी सामना जिंकत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे

Updated: Sep 6, 2021, 09:10 PM IST
INDvsENG : शानदार विजय! ओव्हल कसोटीत भारताने इंग्रजांना लोळवलं title=

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने यजमान इंग्लंडवर मात करत ओव्हल कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली जिगरबाज बॅटिंग आणि त्याला भारतीय गोलंदाजांनी दिलेली दमदार साथ या जोरावर भारताने इंग्लंडवर 157 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे.

ओव्हल कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. 

दुसऱ्या डावात मात्र भारतीय फलंदाजांनी मैदानावर तळ ठोकला. सलामीला आलेल्या रोहित शर्माची 127 धावांची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजारा (61 धावा), विराट कोहली (44 धावा) ऋषभ पंत (50 धावा) आणि शार्दुल ठाकूर (60 धावा) यांच्याजोरावर भारताने 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. मुंबईकर शार्दुल ठाकूरने दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली.

दुसऱ्या डावात विजयाच्या इराद्याने खेळणाऱ्या इंग्लंडने सावध सुरुवात केली. रॉरी बर्न्स आणि हसीब हमीदने शंभर धावांची पार्टनरशिप करत चांगली सुरुवात केली. पण शार्दुल ठाकूरने बर्न्सची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि रविंद्र जडेजाने इंग्लंडला एकामागोमाग एक धक्के दिले आणि इंग्लंडचा डाव 210 संपुष्टात आला. 

भारतातर्फे जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर उमेश यादव सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तब्बल 50 वर्षांनी भारताने ओव्हलवर विजय  मिळवला आहे.