India-South Africa 3rd ODI Highlights : गुरुवारी पार्लमध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा केलाय. के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश मिळालं आहे.
शेवटच्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने 2-1 अशी सिरीजही नावे केली. टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 296 रन्स केले. याच्या प्रत्युत्तरात 45.5 ओव्हरमध्ये अवघे 218 रन्स करू शकली.
टॉस गमावल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने 114 बॉल्समध्ये 6 फोर आणि 3 सिक्सेच्या मदतीने 108 रन्स केले. यासह त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतकही झळकावलंय. तिलक वर्मानेही 77 बॉल्समध्ये 52 रन्सचं योगदान दिलं. यावेळी 5 फोर आणि 1 सिक्स लगावली. संजू आणि तिलक यांनी चौथ्या विकेटसाठी 116 रन्सची पार्टनरशिप केली. तिलकने कारकिर्दीतील पहिलं वनडे अर्धशतकही झळकावलंय.
यानंतर रिंकू सिंगने 27 बॉल्समध्ये 3 फोर आणि 2 सिक्स लगावत 38 रन्स केले. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने टीमचा स्कोरला 300 च्या जवळ नेण्यात योगदान दिलंय. दक्षिण आफ्रिकेकडून बुरॉन हेंड्रिक्सने 9 ओव्हर्समध्ये 63 रन्स देत 3 विकेट्स घेतले.
टीम इंडियाने दिलेल्या 297 रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 45.5 ओव्हर्समध्ये 218 रन्सवर आटोपली. सलामीवीर टोनी डी जोर्जी टीमसाठी सर्वाधिक म्हणजेच 81 रन्स केले. त्याने 87 बॉल्सच्या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. कर्णधार एडन मार्करामने 36 रन्सने योगदान दिलं. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने उत्तम गोलंदाजी करत 9 ओव्हर्समध्ये 30 रन्स देत 4 विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट मिळाली.