भारतानं इतिहास घडवला, पाचव्या वनडेमध्ये आफ्रिकेला लोळवलं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Feb 14, 2018, 12:06 AM IST
भारतानं इतिहास घडवला, पाचव्या वनडेमध्ये आफ्रिकेला लोळवलं title=

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ७३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या २७५ रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा २०१ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवनं ४, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली.

या विजयाबरोबरच भारतानं ६ वनडेच्या सीरीजमध्ये ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकली आहे. डरबनमध्ये झालेली पहिली वनडे भारतानं ६ विकेटनं, सेंच्युरिअनमध्ये झालेली दुसरी वनडे ९ विकेटनी आणि केप टाऊनमध्ये झालेली तिसरी वनडे १२४ रन्सनी जिंकली. पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५ विकेटनी विजय झाला.

भारतानं ५० ओव्हरमध्ये २७४/७ एवढा स्कोअर केला आहे. रोहित शर्मानं झळकवालेल्या शतकामुळे भारताला या स्कोअर पर्यंत मजल मारता आली. वनडे क्रिकेटमधलं रोहितचं हे १७वं शतक आहे. तर दक्षिण आफ्रिकेमधलं रोहितचं हे पहिलंच शतक आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोअर २३ रन्स होता.

या मॅचमध्ये टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण शिखर धवन २३ बॉल्समध्ये ३४ रन्स करुन आऊट झाला. यानंतर रोहितनं विराटच्या मदतीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पण विराट कोहली ३६ रन्सवर असताना रन आऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेला अजिंक्य रहाणेही ८ रन्सवर रन आऊट झाला. अजिंक्य रहाणेनंतर बॅटिंगला आलेल्या श्रेयस अय्यरनं ३७ बॉल्समध्ये ३० रन्स केले. तर हार्दिक पांड्या पहिल्या बॉलला आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या एनगिडीनं ४ तर रबाडानं एक विकेट घेतली.