Rohit Sharma On Shubman Gill Batting: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताचा तरुण फलंदाज शुभमन गिलची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. शुभमनच्या कसोटीमधील कामगिरीसंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर शुभमनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येत आहे. कसोटी सामन्यांमध्ये यशस्वी जयसवाल सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी उतरत असल्याने शुभमनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जात आहे. गिलने स्वत: या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता गिलच्या फलंदाजीसंदर्भात आता थेट कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली आहे.
शुभमन गिलला पहिल्या 2 डावांमध्ये केवळ 26 धावा करता आल्या. त्यामुळे शुभमनचं अपयश पुन्हा चर्चेत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना रोहित शर्माला गिलच्या फलंदाजीच्या क्रमांकासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. "कसोटी क्रिकेटमध्ये आपल्यासाठी तिसरा क्रमांकच उत्तम असल्याचं गिलला वाटतं. त्याला सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण त्याच्या मते तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामध्ये केवळ एका चेंडूचा फरक असतो. (पहिल्या चेंडूत सलामीवीर बाद झाला तर पुढच्या चेंडूवर तो फलंदाजीला असेल.) एखादी व्यक्ती जखमी असेल तर तर तो सलामीला उतरणारा फलंदाज ठरतो. गिल फार स्मार्ट आहे आणि तो स्वत:च्या फलंदाजीच्या शैलीला फार उत्तमप्रकारे जाणून आहे. त्याला त्या क्रमांकावर खेळायला आवडतं. त्याने रणजी ट्रॉफीमध्येही बऱ्याचदा त्या स्थानाच्या आसपास फलंदाजी केली आहे. त्याने एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही प्रकारामध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. मात्र त्याचा प्राधान्य क्रम नंबर एकला फलंदाजी करण्यास आहे. आपण सलामीला आल्यावर फार उत्तम कामगिरी करतो असं त्याला वाटतं," अशी प्रतिक्रिया रोहितने नोंदवली.
रोहितला स्वत:ला कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल काय वाटतं हे ही त्याने सांगितलं. "तुम्ही फलंदाजीच्या परिस्थितीबद्दल कसा विचार करता ही तुमची वैयक्तिक गोष्ट आहे. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडत नाही. माझ्यामते तुम्ही फलंदाजीची सुरुवात केली पाहिजे किंवा वाट पाहून फलंदाजीला आलं पाहिजे आणि पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळलं पाहिजे. मात्र जेव्हापासून मी सलामीवीर म्हणून फलंदाजी करतोय तेव्हापासून मला 3 ते 7 क्रमांकावर फलंदाजी करणं हे फारशी चांगला क्रमांक असतो असं वाटत नाही," असंही रोहितने सांगितलं.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आजपासून सुरु होणारी कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. न्यूलॅण्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी कायमच उत्तम राहिली आहे. दोन्ही संघांदरम्यान या मैदानात 6 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी एकाही सामन्यात भारताला विजय मिळालेला नाही. भारत या कसोटीत इतिहास घडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.