भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 'एल्गार'

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनेही जोरदार पुनरागमन केलं आहे.

Updated: Oct 4, 2019, 05:28 PM IST
भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 'एल्गार' title=

विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनेही जोरदार पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ३८५/८ एवढा झाला आहे. तरी दक्षिण आफ्रिका अजूनही ११७ रननी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ३९/३ असा होता. यानंतर तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने ३४६ रन केले. डीन एल्गारने १६० रनची तर क्विंटन डिकॉकने १११ रनची खेळी केली. कर्णधार फॅफ डुप्लेसिस ५५ रन करुन आऊट झाला.

भारताकडून रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. २७व्यांदा अश्विनने टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये ५ विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. तर रवींद्र जडेजाला २ विकेट मिळाल्या आहेत. रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २०० विकेट घेणारा डावखुरा बॉलर ठरला आहे. ४४व्या टेस्टमध्येच जडेजाने २०० विकेटचा टप्पा गाठला. ईशांत शर्मालाही १ विकेट घेण्यात यश आलं आहे.

दुसऱ्या दिवशी भारताने त्यांचा डाव ५०२ रनवर घोषित केला होता. मयंक अग्रवालने पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक आणि रोहित शर्माने शतकी खेळी केली. भारतातल्या आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम मयंक अग्रवालने केला होता. तर पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंग करणाऱ्या रोहितनेही शतक करण्याचा रेकॉर्ड केला. मयंक आणि रोहित यांच्यामध्ये ३१७ रनची पार्टनरशीप झाली.