India vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळेस भारताने विराट कोहलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलेला

Updated: Jan 20, 2023, 11:02 AM IST
India vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या title=
india vs pakistan Cricket Match

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान अंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मागील बऱ्याच वर्षांपासून दोन्ही संघांदरम्यान क्रिकेट सीरीजचं (India vs Pakistan Circket) आयोजन करण्यात आलेलं नाही. पारंपारिक प्रतिस्पर्धी असेलले हे दोन्ही संध्या आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया चषकामध्येच (Asia Cup) एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतात. अशीच एक संधी आता दोन्ही देशांच्या चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या वर्षी होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) आणि एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक (ODI World Cup 2023) स्पर्धेमध्ये एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघांचे सामना कधी होणार आहे याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

अमेरिकेतील सामन्यासाठी प्रयत्न...

2024 टी-20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना दोन्ही संघांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अतुल राय यांनी या सामन्यासंदर्भातील  संकेत दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना वेस्ट इंडीजमध्ये नाही तर अमेरिकेत खेळवला जाणार आहे, असा दावा राय यांनी केला आहे. दोन्ही संघ यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना झाला होता. 

फ्लोरिडात भारत-पाकिस्तान सामना?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राय यांनी एका मुलाखतीमध्ये, "फ्लोरिडामध्ये भारत-वेस्ट इंडीज सामन्याला स्थानिक क्रिकेट चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत. त्यामुळेच भारत-पाकिस्तान सामनाही याच ठिकाणी झाला तर चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटतं," असं म्हटलं आहे. मागील वर्षी भारताने वेस्ट इंडीज आणि अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी टी-20 सीरीजमधील अखेरचा सामना फ्लोरिडामध्ये खेळवण्यात आला होता. 

आशिया चषक स्पर्धेतही भारत-पाकिस्तान

आशिया चषक 2023 साली सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बंगलादेश, अफगाणिस्तान आणि क्वालिफाय होणार संघ असेल. स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका एकाच गटात आहेत. तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि क्वालिफाय होणारा सहावा संघ अन्य ग्रुपमध्ये असणार आहे. त्यानंतरचा एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतामध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एक भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. मात्र हा कधी आणि कुठे खेळवला जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. 

कुठे खेळवली जाणार स्पर्धा?

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र ही स्पर्धे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई किंवा श्रीलंकेला खेळवली जाण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप ही स्पर्धा नक्की कुठे खेळवली जाईल हे स्पष्ट झालेलं नाही. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेचं जेतेपद श्रीलंकेने पटकावलं होतं.