मुंबई : क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष (IND vs PAK) पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतात. जर तुम्हीही क्रिकेटप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम एका खास टेस्ट सामन्यासाठी एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात टेस्ट सिरीज आयोजित करण्याची कल्पना सुचवली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी सध्याच्या ट्वेंटी-20 सिरीजदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केलीये. त्यानुसार ईसीबीला भारत-पाक यांच्यात तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजसाठी यजमानपद द्यायचं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबी यावेळी इंग्लिश भूमीवर भारताविरुद्ध खेळण्यास उत्सुक नाही परंतु ईसीबीच्या ऑफरबद्दल कृतज्ञ असल्याचं समजतंय.
आता द्विपक्षीय टेस्ट सिरीजबाबत बीसीसीआयचे वक्तव्यही समोर आलंय. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, "पहिली गोष्ट म्हणजे ईसीबीने भारत-पाकिस्तान मालिकेबाबत पीसीबीशी बोललं आहे, जे थोडे विचित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत, पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेचा निर्णय बीसीसीआय नाही तर सरकार घेईल. स्थिती अजूनही कायम आहे. आयसीसीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येच आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळू."
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून द्विपक्षीय सिरीज झालेली नाही. 2012-13 मध्ये भारतीय भूमीवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला. पाकिस्तान टीमने एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. त्यामुळे आता फक्त दोन्ही देश आयसीसी वर्ल्डकप आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात.