माऊंट मॉनगनुई : निलंबनाच्या कारवाईनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्यानं चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं १० ओव्हरमध्ये ४५ रन देऊन २ विकेट काढल्या. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा उत्कृष्ट कॅच पकडला. भारताच्या सुरुवातीच्याच बॅट्समननी न्यूझीलंडनं दिलेल्या २४४ रनचा पाठलाग केला. त्यामुळे हार्दिक पांड्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
पुनरागमनाच्या मॅचमध्ये अशी कामगिरी करणारा हार्दिक पांड्या मैदानात मात्र शिखर धवनवर भडकलेला पाहायला मिळाला. १४ व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर रॉस टेलरनं मिड विकेटच्या दिशेनं बॉल मारला. हा बॉल धवननं लगेच पकडून थ्रो केला, पण धवनच्या या थ्रोची दिशा चूकली आणि रॉस टेलरनं दुसरी रन काढली. शिखर धवनच्या या ओव्हर थ्रोमुळे हार्दिक पांड्या चिडला आणि शिखर धवनला 'कम ऑन यार' असं म्हणाला.
Watch: Hardik Pandya loses his cool at Shikhar Dhawan for his bad throw#NZvIND #HardikPandya #ShikharDhawan pic.twitter.com/jJcZkWHOBG
— Mohsin Kamal (@64MohsinKamal) January 28, 2019
कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं बीसीसीआयनं निलंबन केलं होतं. हे निलंबन उठवल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मैदानात दिसला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन मॅचमध्ये खेळलेल्या विजय शंकरच्याऐवजी हार्दिक पांड्याला या मॅचमध्ये संधी देण्यात आली होती.
माऊंट मॉनगनुईच्या बे ओव्हल मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ३-०ची विजयी आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतानं सुरुवातीपासूनच धक्के दिले. त्यामुळे न्यूझीलंडची टीम २४३ रनवर ऑल आऊट झाली. रॉस टेलर आणि टॉम लेथमनं न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. रॉस टेलर ९३ रनवर तर टॉम लेथम ५१ रनवर आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.
२४४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ६२ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीनं ६० धावांची खेळी केली. शिखर धवन २८ रनवर आऊट झाला. अंबाती रायुडू ४० रनवर नाबाद आणि दिनेश कार्तिक ३८ रनवर नाबाद राहिला. न्यूझीलंड दौऱ्यातील कर्णधार विराट कोहलीची ही शेवटची मॅच होती. विराटच्या जागी आता शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करेल. लागोपाठ क्रिकेट खेळत असल्यामुळे विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय टीम प्रशासनानं घेतला आहे.