मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने दणदणीत विजय झाला आहे. ५ टी-२० मॅचची सीरिज ५-०ने जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. तसंच भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० सीरिजही जिंकली आहे. या टी-२० विजयाचा उत्साह ताजा असतानाच भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे वनडे आणि टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० मॅचवेळी बॅटिंग करताना रोहित शर्माच्या पोटरीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे पाचव्या टी-२० मॅचमध्ये रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला. रोहित ४१ बॉलमध्ये ६० रन करुन आऊट न होताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो फिल्डिंगलाही आला नाही.
Top India batsman Rohit Sharma ruled out of ODI and Test series against New Zealand due to calf injury: BCCI source
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2020
रोहित शर्मा वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. भारतीय टीम न्यूझीलंडमध्ये ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ५ फेब्रुवारीला सीरिजची पहिली वनडे मॅच खेळवण्यात येणार आहे.
वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली असली तरी टेस्ट टीम मात्र अजूनही घोषित झालेली नाही. त्यामुळे रोहित शर्माऐवजी आता कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. रोहित शर्माच्या आधी हार्दिक पांड्याही दुखापतीतून न सावरल्यामुळे टेस्ट सीरिजला मुकणार असल्याचं निश्चित झालं होतं. तसंच इशांत शर्माला रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये पायाला दुखापत झाल्यामुळे त्याचं टेस्ट सीरिज खेळणंही कठीण आहे.
भारताची वनडे टीम
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल