साऊथॅम्पटन : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारतानं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही ३९वी टेस्ट आहे. त्याआधी ३८ टेस्टमध्ये विराट कोहलीनं टीममध्ये बदल केले होते. इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं जिंकली होती. तिसऱ्या टेस्टमध्ये मैदानात उतरलेली टीम घेऊनच खेळण्याचा निर्णय विराटनं घेतला.
वारंवार टीममध्ये बदल केल्यामुळे विराट कोहलीवर टीका होत होती. पण बदल केल्यामुळे टीमला विजय मिळत असेल तर मला टीम बदलण्यात कोणतीही अडचण नाही, असं स्पष्ट मत विराटनं व्यक्त केलं होतं.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले होते. मुरली विजय आणि कुलदीप यादवऐवजी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीला टीममध्ये स्थान मिळालं. यानंतर विराट पृथ्वी शॉला अंतिम ११ मध्ये घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पृथ्वी शॉनंही या मॅचआधी जोरदार सराव केला होता. पृथ्वी शॉचा सराव करतानाचा एक व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विटरवरून शेअर केला होता. पण विराटनं टीममध्ये कोणतेही बदल केले नाहीत.
Young @PrithviShaw gearing up for the nets session here at The Ageas Bowl.#ENGvIND pic.twitter.com/p5DdaReDrJ
— BCCI (@BCCI) August 27, 2018