बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये सध्या उन्हाळा आहे. इथलं वातावरण सध्या मुंबई आणि चेन्नईसारखं असल्याची प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेनं दिली आहे. इंग्लंडमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे खेळपट्टी आणि मैदान सुकलं आहे. त्यामुळे मॅचमध्ये बॉल स्पिन आणि रिव्हर्स स्विंग होईल असा अंदाज आहे. असं झालं तर या मॅचमध्ये भारताचं पारडं मजबूत होईल. हा धोका टाळण्यासाठी मैदानात फक्त ३६ मिनिटांमध्ये ४७ हजार लीटर पाणी मारण्यात आलं.
मैदानामध्ये पाणी मारल्यामुळे गवत हिरवं राहिल तसंच बॉल रिव्हर्स स्विंग आणि स्पिन करायलाही कठीण जाईल. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून मात्र पुन्हा मैदान सुकेल, असं बोललं जातंय.
इंग्लंडमध्ये सध्या प्रमाणापेक्षा जास्तच उन्हाळा आहे. त्यामुळे खेळपट्टा कशा असतील याबाबत कोणालाच कल्पना नाही. पण अशीच गरमी कायम राहिली तर मात्र भारतीय स्पिनरना याचा फायदा मिळेल. असं असलं तरी पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं अश्विनलाच संधी दिली आहे. टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये शानदार कामगिरी करणारा कुलदीप यादव आणि आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रवींद्र जडेजाला टीमबाहेर बसावं लागलं आहे.
मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा