Shubman Gill Beat Virat Kohli: वर्ल्ड कप 2023 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच भारतीय चाहत्यांना एकामागून एक सुखद धक्के मिळत आहेत. कर्णधार रोहित शर्माबरोबरच भारतीय चाहत्यांसाठी सर्वात समाधानाची बाब ठरत आहे भारताचा सलामीवीर शुभमन गील. मागील 4 डावांमध्ये शुभमनने 2 शतकं झळकावली आहेत. त्याची सध्याची कामगिरी पाहता पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये शुभमनची बॅट गोलंदाजांवर भारी पडणार असं चित्र सध्या दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूरच्या मैदानात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये शुभमनने इंदूरच्या मैदानामध्ये 97 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकार लगावत 104 धावांची खेळी केली. शुभमन गीलने त्याच्या करिअरमधील सहावं शतक झळकावलं आहे. या खेळीसहीत शुभमनने काही विक्रम मोडीत काढले आहे. मात्र त्यामधील एक विक्रम हा भारताची रन मशीन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या विराटलाही करता आला नाही असा आहे.
एकदिवसीय क्रिकेटचं करिअर सुरु केल्यानंतर सर्वात कमी डावांमध्ये 6 शतकं झळकावण्याचा विक्रम शुभमनने केला आहे. सध्या सर्वात कमी डावांमध्ये 6 शतकं झळकावणारा खेळाडू म्हणून आता शुभमन ओळखला जाणार आहे. वेगाने 6 शतकं झळावणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास गौतम गंभीर हा पाचव्या स्थानी आहे. त्याने 68 डावांमध्ये 6 शतकं झळकावली. चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे के. एल. राहुल आणि शिखर धवन हे विराटपेक्षाही याबाबतीत अधिक सरस आहेत ही आश्चर्याची बाब आहे. विराटला त्याची पहिली 6 शतकं पूर्ण करण्यासाठी 61 डाव खेळावे लागले. के. एल. राहुलने हाच पराक्रम 53 डावांमध्ये केला. शिखर धवनला या माइलस्टोनला पोहचण्यासाठी 46 डाव खेळावे लागले.
शुभमन गिलने हाच विक्रम आपल्या नावावर केवळ 35 खेळींमध्ये केला आहे. त्याने 35 सामन्यांमधील 35 डावांमध्ये फलंदाजी करताना 1917 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 208 इतकी आहे. शुभमनच्या 6 शतकांपैकी 5 त्याने याच वर्षी केली आहेत. त्याने 66.10 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 102.84 इतका आहे. त्याने 9 अर्धशतकंही झळकावली आहेत. एकूण 213 चौकार आणि 40 षटकार लगावले आहेत. म्हणजेच पहिल्या 6 शतकांबद्दल बोलायचं झाल्यास विराटपेक्षा जवळपास अर्ध्या डावांमध्ये शुभमनने हा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याने विराटला पहिल्या 6 शतकांसंदर्भातील शर्यतीत खरोखरच फारच मागे टाकलं आहे.