मेलबर्न : भारताने मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच पहिल्यांदा 2-1 च्या अंतराने द्विपक्ष मालिका जिकंली. मेलबर्नच्या मैदानावर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले असून त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारतीय संघाने आणि खेळाडूंनी काही विक्रम केले आहेत. तसेच काही विक्रम खालीलप्रमाणे :
मेलबर्नवर झालेल्या आजच्या एकदिवसीय सामन्यात धोनीच्या नाबाद 87 धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला. धोनीने सिडनीत झालेल्या पहिल्या सामान्यात 96 बॉलमध्ये 51 धावा केल्या होत्या. धोनीला या सामन्यात पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे माघारी जावे लागले होते. तसेच पहिल्या सामन्यातील पराभवाला धोनीला कारणीभूत ठरवले गेले होते. यानंतर एडलेडला झालेल्या दुसऱ्या सामन्यात धोनीने नाबाद 54 बॉलमध्ये 55 धावा केल्या. धोनीच्या या खेळीमुळे भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यातील तिन्ही सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली. याआधी असा विक्रम धोनीने दोन वेळा केला आहे. ही तिसरी वेळ. इंग्लंड दौऱ्यावर असताना 2011 साली धोनीने क्रमश: 69, नाबाद 78 आणि नाबाद 50 धावांची खेळी केली होती. यानंतर एकाच मालिकेत सलगपणे अर्धशतक करण्याची कामगिरी धोनीने 2014 ला न्यूझीलंड विरुद्धात धोनीने सलग 56, 50, आणि नाबाद 79 धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही समीकरणे ही नेहमीचीच झालेली आहेत, किंवा ती तशीच राहतील. दक्षिण अफ्रिकेचा ग्रेम स्मिथला झहीर खान नेहमीच बाद करायचा. अर्थात ग्रेम स्मीथ हा जहीरचा बकराच झाला होता. तशीच काहीशी कामगिरी भारताच्या भुवनेश्वरने केली आहे. भुवनेश्वरने आजच्या मेलबर्नवरील सामन्यात एरॉन फिंचला पायचीत केले. याआधीच्या सिडनीत झालेल्या पहिल्या सामन्यात आणि एडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात देखील भुवनेश्वर कुमारने एरॉन फिंचला बाद केले होते. त्यामुळे ही त्याची एकाच खेळाडूला बाद करण्याची हॅट्रीक ठरली आहे.
विशेष म्हणजे या तीन सामन्यांच्या मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये पहिली विकेट ही भुवनेश्वर कुमारनेच मिळवून दिली. तसेच पहिल्या दोन सामन्यांमध्ये एरॉन फिंचला 6 धावांवर भुवनेश्वरने बोल्ड केले होते. तर आजच्या सामन्यात फिंचला पायचीत केले.
मेलबर्नचा सामना जिंकण्यासोबत भारताने ही एकदिवसीय मालिकादेखील आपल्या खिशात घातली. पण या मालिका विजयाचा आनंद काही औरच आहे. कारण या सामन्यासोबत भारताचा पहिलीच द्विसंघ मालिका विजय ठरला आहे. याआधी भारताने 2008 ला झालेली कॉमनवेल्थ बँक सीरिज (ज्यात तीन संघांचा समावेश होता.) तसेच 1985 साली झालेली वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकण्यात यश आले आहे. तसेच 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताला तब्बल 71 वर्षांनी 2-1 च्या अंतराने मालिका जिंकता आली. त्यामुळे या कसोटी मालिकेतील विजय भारतीय संघासाठी मह्त्वपूर्ण ठरला.