'विराट'सेना २०१८ची शेवटची वनडे खेळणार, भारतीय टीमचं यावर्षीचं प्रगती पुस्तक

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये गुरुवारी १ नोव्हेंबरला पाचवी आणि शेवटची वनडे मॅच रंगेल.

Updated: Oct 31, 2018, 05:47 PM IST
'विराट'सेना २०१८ची शेवटची वनडे खेळणार, भारतीय टीमचं यावर्षीचं प्रगती पुस्तक title=

तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये गुरुवारी १ नोव्हेंबरला पाचवी आणि शेवटची वनडे मॅच रंगेल. या वर्षातली भारताची ही शेवटची वनडे मॅच असेल. यानंतर भारत वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सीरिज खेळेल. तर टी-२० सीरिजनंतर भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी-२० सीरिजपासून होईल. यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये टेस्ट सीरिज आणि जानेवारीमध्ये वनडे सीरिज खेळवली जाईल.

यावर्षी भारताच्या १९ वनडे

भारतानं यावर्षी १९ वनडे मॅच खेळल्या आहेत. यातल्या १३ मॅचमध्ये त्यांचा विजय आणि ४ मॅचमध्ये पराभव झाला. तर दोन मॅच टाय झाल्या. इंग्लंडनं यावर्षी सर्वाधिक मॅच जिंकल्या आहेत. इंग्लंडचा २४ मॅचपैकी १७ मॅचमध्ये विजय झाला. सर्वाधिक मॅच जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतकं-रन

यावर्षी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं वनडेमध्ये सर्वाधिक रन आणि शतकं केली आहेत. विराटनं १३ मॅचमध्ये ११६९ रन केले आहेत. यामध्ये ६ शतकांचा समावेश आहे. विराटशिवाय इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोनं यावर्षी १ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. बेअरस्टोनं २०१८मध्ये १०२५ रन केले आहेत. सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं यावर्षी ५ शतकं केली आहेत. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं यावर्षी ९६७ रन केले आहेत.

रोहित शर्माच्या सर्वाधिक सिक्स

२०१८ साली रोहित शर्मानं सर्वाधिक सिक्स मारले आहेत. रोहितनं यावर्षी खेळलेल्या १८ मॅचमध्ये ३५ सिक्स लगावले आहेत. या यादीत इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो(३१ सिक्स) दुसऱ्या क्रमाकांवर, वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमेयर(२९) तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलनं फक्त ९ मॅच खेळल्या असल्या तरी त्यानं तब्बल २२ सिक्स मारले आहेत. या यादीत गेल चौथ्या क्रमांकावर आहे. 

धोनीनं केले सर्वाधिक स्टम्पिंग

महेंद्रसिंग धोनीनं २०१८ मध्ये सर्वाधिक स्टम्पिंग केले आहेत. धोनीनं यावर्षी १८ मॅचमध्ये १० स्टम्पिंग केले आहेत. यावर्षी धोनीनं १६ कॅचही घेतले आहेत. अशाप्रकारे सर्वाधिक बळी घेणाऱ्या विकेट कीपरच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा जॉस बटलर(२३ मॅच, ३५ विकेट) पहिल्या क्रमांकावर, झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर (२१ मॅच २९ विकेट) दुसऱ्या क्रमांकावर, आयर्लंडचा नील ओब्रायन (१३ मॅचमध्ये २६ विकेट) धोनीसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीपनं १८ मॅचमध्ये ४४ विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राशीद खाननं ४८ विकेट घेतल्या. २०१८ साली सर्वाधिक विकेट घेणारे पहिले ४ खेळाडू स्पिनर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा आदिल रशीद(४२ विकेट), चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान(३७ विकेट) आहे. पाचव्या क्रमांकावर झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर तेंदई चतारा(२९ विकेट) आणि सहाव्या क्रमांकावर युझवेंद्र चहल(२९ विकेट) आहे. यावर्षी ६ विकेट फक्त तीनच बॉलर घेऊ शकले आहेत. यामध्ये कुलदीप यादव, श्रीलंकेचा अकिला धनंजया आणि दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरचा समावेश आहे.