जकार्ता : इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतानं तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला आशियाई स्पर्धेत पहिल्या सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. बजरंगनं ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात जपानच्या ताकातानी दाईचीवर ११-८ अशी मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदकाला गवसणी घातली.
विनेशनं महिलांच्या ५० किलो वजनी गटात फ्री-स्टाईल गटात जपानच्या की इरी-युकीला ६-२ अशी धूळ चारली. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरलीय. तर नेमबाज सौरव चौधरीनं आशियाई स्पर्धेत भारताला तिसरं सवर्ण पदक पटकावून दिलं. सौरवनं १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाचा वेध घेतला. सौरवनं २४०.७ गुणांची कमाई करत पदकाचा वेध घेतला.
आतापर्यंत चीनने 20 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य पदक जिंकले आहेत. या पाठोपाठ जपानने 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदक जिंकले आहेत. भारताने 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक जिंकले आहेत.