मुंबई : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी (India-England Test Series) सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर (The Oval) खेळला जाणार आहे. सीरिजमध्ये भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. शेवटचे दोन कसोटी सामने दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे असणार आहेत. चौथा कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला मलिकेत आघाडी मिळलेच, शिवाय पाचव्या कसोटी सामन्यासाठी आत्मविश्वासही वाढलेला असेल.
चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी नविन रणनिती आखली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानेही (Team India) एक सर्वांनाच चकीत करणारा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच टीम इंडियात एका युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.
चौथ्या कसोटीपूर्वी संघ व्यवस्थापनाने युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) संघात समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रसिद्ध कृष्णाची भारतीय संघात एन्ट्री झाली आहे. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात प्रसिद्धने चार विकेट घेतल्या होत्या.
UPDATE - Prasidh Krishna added to India’s squad
More details here - https://t.co/Bun5KzLw9G #ENGvIND pic.twitter.com/IO4JWtmwnF
— BCCI (@BCCI) September 1, 2021
प्रसिद्ध कृष्णा इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत राखीव खेळाडू म्हणून आला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या (Virat Kohli) या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. वास्तविक, ओव्हल कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल दिसू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार हे उद्या स्पष्ट होईल.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेट कीपर), आर. आश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, रिद्धीमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव, प्रसिद्द कृष्णा
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. दुसऱ्या डावात भारताने 10 गडी गमावून केवळ 278 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 76 धावांनी जिंकला. त्यामुळे दोन्ही संघ मालिकेत आता 1-1 ने बरोबरीत आहे.