मुंबई : भारत आणि पाकिस्तान आतापर्यंतच्या विश्वचषकामध्ये ६ वेळा आमने-सामने उभे ठाकले आहेत. यातील सर्वच्या सर्व ६ लढतींमध्ये भारताने विजय साकारला आहे. तर पाकिस्तानच्या पदरी नेहमीच पराभव पडला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लढतीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत सातवा विजय संपादन करणार का, याचीच उत्सुकता आहे.
विश्वचषकामध्ये पाकिस्तानने भारतासमोर नेहमीच शरणागती पत्करली आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारत कधीही पराभूत झालेला नाही. आपली हिच परंपरा कायम राखण्याच्या इराद्यानेच विराट सेना यावेळेही पाकिस्तानशी दोन हात करायला रणभूमीत उतरेल.
२०१९ विश्वचषकामध्ये ब्लॉकब्लास्टर मुकाबला होणार आहे. भारत-पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. या दोन्ही संघामध्ये क्रिकेटच्या रणभूमीत महायुद्ध रंगणार आहे. विश्वचषकाच्या महायुद्धात भारतानं आपले कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नेहमीच चारीमुंड्या चित केलंय.
भारत आणि पाकिस्तान आतापर्यंतच्या विश्वचषकामध्ये ६ वेळा आमने-सामने उभे ठाकले आहेत. यातील सर्वच्या सर्व ६ लढतींमध्ये भारतानं विजय साकारला. तर पाकिस्तानच्या पदरी नेहमीच पराभव पडला आहे. विश्वचषकात भारतासमोर पाकिस्ताननं नेहमीच कच खाल्लीय.
- १९९२ विश्वचषकात भारतानं सिडनी मैदानावर पाकिस्तानला ४३ धावांनी धुळ चारली होती.
- १९९६ विश्वचषकात भारतानं बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ३९ धावांनी विजय साकारला.
- १९९९ विश्वचषकात भारतानं मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानावर ४७ धावांनी पाकिस्तानवर विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
- २००३ विश्वचषकात भारतानं सेंच्युरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानावर ६ फलंदाज राखत नेस्तनाबूत केलं.
- २०११ विश्वचषकात मोहालीमध्ये रंगलेल्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानवर २९ धावांनी विजय साकारला.
- २०१५ विश्वचषकात अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ७६ धावांनी नेस्तनाबूत केलं.
अगदी टी-ट्वेन्टी विश्वचषकातही भारतानं पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पाचही सामन्यात विजय साकारलाय. विश्वचषकातील भारत-पाकिस्तानचा हा इतिहास पाहता भारतातचं पारड जड वाटत आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहण्याची परंपरा यावेळीही कायम राखण्यासाठी विराट अॅण्ड कंपनी नक्कीच जीवाच रान करतील.