India-Pakistan Players Fight: भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असला तर फक्त खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकही प्रचंड उत्साहात असतात. क्रिकेटचा सामना असो किंवा मग हॉकीचा...दोन्ही संघ आमने-सामने असल्याने भावनांचाही बांधही उंचावलेला असतो. क्रिकेटमध्ये तर अनेकदा दोन्ही संघाचे खेळाडू आपापसात भिडले आहेत. पण नुकतंच फुटबॉल सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. बुधवारी रात्री झालेल्या या SAFF फुटबॉल चॅम्पिअनशिपमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू आमने-सामने आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
सामन्याच्या फर्स्ट हाफनंतर वादाला सुरुवात झाली होती. भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टीमॅक (Indian Head Coach Igor Stimac ) यांनी पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला याला फुटबॉल फेकण्यापासून रोखलं. यामुळे पाकिस्तानी खेळाडू संतापले आणि दोन्ही संघात वाद पेटला. दरम्यान पंचांनीही इगोर यांना रेड कार्ड दाखवलं. बंगळुरुत श्री कांतीवीर स्टेडियममध्ये हा सामना पार पडला.
या वादानंतर इगोर यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या संघाचं रक्षण करण्यासाठी गरज असेल तर आपण पुन्हा असं काही करु असं ते म्हणाले आहे. दरम्यान हा वाद झाला तेव्हा भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर होता. सुनील छेत्रीने केलेल्या दोन गोल्समुळे भारतीय संघाने आघाडी घेतली होती.
"फुटबॉल ही एक भावना आहे. खासकरुन जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता. कालच्या माझ्या कृतीबद्दल तुम्ही माझा तिरस्कार किंवा प्रेम करू शकता, परंतु मी एक योद्धा आहे आणि आमच्या खेळाडूंविरोधात दिल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयाविरोधात संरक्षण करण्यासाठी मी पुन्हा ते करेन," असं इगोर स्टिमॅक यांनी ट्विट केलं आहे.
Football is all about passion, especially when you defend the colours of your country.
You can hate or love me for my actions yesterday, but I am a warrior and I will do it again when needed to protect our boys on the pitch against unjustified decisions. pic.twitter.com/Jgps3hrmDP
— Igor Štimac (@stimac_igor) June 22, 2023
दरम्यान वादानंतर पंच प्रज्जल छेत्री आणि इतर अधिकाऱ्यांना दोन्ही संघाच्या खेळाडूंना दूर करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. यानंतर इगोर यांना साइलाइनला उभं राहता आलं नाही. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक महेश गवळी यांच्यावर नंतर जबाबदारी आली होती. माझ्या वरिष्ठाला दिलेलं रेड कार्ड थोडं कठोर वाटू शकतं, परंतु रेफरीला नियमानुसार जावं लागेल असं ते म्हणाले.
दरम्यान SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला 4-0 ने नमवत भारताने विजयासह विजेतेपदाची सुरुवात केली. अनुभवी सुनील छेत्रीने सामन्यात हॅट्ट्रिक साधत पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं दाखवून दिलं.