14 चेंडूंमध्ये 62 धावा करणारा यशस्वी हार्दिक पंड्याचे आभार मानत म्हणाला, 'त्याने ज्यापद्धतीने...'

Ind vs WI Yashasvi Jaiswal Post Match Interview: यशस्वी जयसवालने शुभमन गिलच्या मदतीने भारताला सहज सामना जिंकून दिला. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामन्या संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये यशस्वीने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2023, 08:13 AM IST
14 चेंडूंमध्ये 62 धावा करणारा यशस्वी हार्दिक पंड्याचे आभार मानत म्हणाला, 'त्याने ज्यापद्धतीने...' title=
सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये मानले आभार

Ind vs WI Yashasvi Jaiswal Post Match Interview: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासहीत भारताने मालिका 2-2 च्या बरोबरीत आणली आहे. लॉडरहिलमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने मालिकेतील चौथा सामना 18 चेंडू शिल्लक असताना 9 गडी राखून जिंकला. भारताने 179 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. भारतीय सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिलने पहिल्या विकेट्ससाठी 15.3 षटकांमध्ये 165 धावांची पार्टनरशीप केली. यशस्वीने 51 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावा केल्या. तर गिलने 47 चेंडूमध्ये 77 धावा केल्या. मालिकेतील पाचवा आणि निर्णयाक सामना लॉडरहिल मैदानातच खेळवला जाणार आहे.

14 चेंडूंमध्ये 62 धावा 

यशस्वीने आपल्या दुसऱ्याच टी-20 सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने 165 च्या सरासरीने 84 धावा केल्या. या खेळीमध्ये यशस्वीने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ 14 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. या खेळीसाठी यशस्वीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीबरोबरच शुभमन गिलसोबत फलंदाजी करण्यासंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं.

हार्दिकचे मानले आभार

"आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळं सोप नाही. मात्र मला मैदानात आनंद घेऊन खेळायचं आहे. मी हे करण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. मला यासाठी हार्दिक भाई आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना (सपोर्टींग स्टाफला) धन्यवाद म्हणायचं आहे. त्यांनी ज्यापद्धतीने माझ्याबरोबर सामन्याआधी चर्चा केली, मला विश्वासात घेतलं त्याचा फार सकारात्मक परिणाम झाला," असं यशस्वी म्हणाला.

गिलबरोबर खेळण्याबद्दल काय म्हणाला यशस्वी

टी-20 मधील फलंदाजीसंदर्भात बोलताना यशस्वीने, "मी संघाला आवश्यकता असते तशापद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी किती वेगाने धावा करु शकतो याचाच मी विचार करत असतो. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो. यासाठी खेळपट्टी समजून घेणं आवश्यक आहे. मी कायम जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार करुनच मैदानात उतरतो. गिलबरोबर फलंदाजीचा अनुभव फारच सुखद होता. कोणत्या गोलंदाजांवर तुटून पडायचं हे आम्हाला ठाऊक होतं," असंही सांगितलं.

मालिका कोण जिंकणार?

पहिल्या 2 सामन्यांमध्ये यजमान संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सलग 2 सामने जिंकून मालिका 2-2 च्या बरोबरीमध्ये आणली. आता शेवटच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार यावर ही टी-20 मालिका कोण जिंकणार हे अवलंबून आहे. याआधी झालेली एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिका भारताने जिंकली आहे.