IND vs WI: रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला कसोटी इतिहासातील पहिलाच फलंदाज

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहित आणि यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) 98 धावांची भागीदारी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 24, 2023, 08:07 AM IST
IND vs WI: रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला कसोटी इतिहासातील पहिलाच फलंदाज title=

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या डावातच भारताने 183 धावांची मोठी आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड रचत कसोटी इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. 

रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 30 डावात दोन अंकी धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी सलग डावांमध्ये 10 पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेच्या नावे होता. त्याने 29 सामन्यात हा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर आता हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे झाला आहे.  

कसोटी क्रिकेटमध्ये सलग दोन अंकी धावा करण्याचा विक्रम - 

रोहित शर्मा - 30 सामने (भारत)
महेला जयवर्धने - 29 सामने (श्रीलंका)
लेन हुटन - 25 सामने (इंग्लंड)
रोहन कन्हई - 25 (वेस्ट इंडिज)
ए बी डेव्हेलियर्स - 24  (दक्षिण आफ्रिका)

रोहितने गेल्या 30 कसोटी डावांमध्ये केलेल्या धावा - 

12, 161, 26, 66, 25*, 49, 34, 30, 36, 12*, 83, 21, 19, 59, 11, 127, 29, 15, 46, 120, 32, 31, 12, 12, 35, 15, 43, 103, 80, 57*

दरम्यान दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहित आणि यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) अजून एकदा 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.  दोघांमध्ये 98 धावांची भागीदारी झाली आहे. 6 ओव्हर पूर्ण होण्याआधीच दोघांनी 50 धावा केल्या होत्या. भारतीय जोडीने पहिल्यांदाच इतक्या कमी ओव्हरमध्ये 50 धावा केल्या आहेत. 

दरम्यान, रोहितने कसोटी क्रिकेमधील आपलं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने फक्त 35 चेंडूत 50 धावा केल्या. कसोटी इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेलं हे सहावं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. 

रोहित शर्माला 2019 मध्ये पहिल्या क्रमांकावर फलंदाजी कऱण्यासाठी पाठवल्यानंतर त्याच्या खेळात चांगलीच सुधारणा झाली आहे. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आपली छाप पाडू शकला नसल्याने अनेकांनी त्याला संघात स्थान दिल्याने टीका केली होती. पण ऑक्टोबर 2019 मध्ये आघाडीला फलंदाजीसाठी पाठवल्यापासून रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.