मुंबई : टी-२० सीरिज खिशात घातलेली टीम इंडिया रविवारी श्रीलंके विरूद्ध तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला व्हाइटवॉश देण्यासाठीच मैदानात उतरेल.
श्रीलंकेसाठी हा दौरा निराशाजनकच राहिला. टीम इंडियाने कटकमधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ९३ रन्सने मात दिली. त्यानंतर इंदोर येथील दुसरा सामना ८८ रन्सने जिंकत सीरिज नावावर केली. याआधी वनडेमध्ये श्रीलंकेला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. तर टेस्टमध्येही श्रीलंकेला चांगला फटका बसला.
दुसरीकडे टीम इंडियाने सर्वच बाजूने चांगलं प्रदर्शन केलं आणि दक्षिण आफ्रिका दौ-याआधी आणखी एक सामना जिंकून त्यांना आत्मविश्वास वाढवायचा असेल. दक्षिण आफ्रिकेत त्यांना तीन टेस्ट, सहा वनडे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहे. लागोपाठ एकतर्फ़ी मिळालेले विजय दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी चांगली तयारी नक्कीच म्हटले जाणार नाहीत. पण यातही सकारात्मक बाब म्हणजे कर्णधार विराट कोहलीसहीत अनेक सिनिअर्सच्या अनुपस्थितीत तरूण खेळाडूंनी वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन केलं.
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पदार्पणातच विकेट घेत आपली जागा निश्चित केली आहे. निवड समितीची नजर सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटवर राहणार आहे. आशिष नेहराची जागा तो घेऊ शकतो. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहची जागा टीममध्ये निश्चित आहे. त्यासोबतच सीरिज जिंकल्यावर टीमचे व्यवस्थापक बासिल थम्पी, वाशिंगट्न सुंदर आणि दीपक हुड्डा यांनाही संधी दिली जाऊ शकते.
कर्णधार रोहित शर्माने सर्वात वेगवान टी-२० शतकांच्या डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. त्याने इंदोरमध्ये ४३ बॉल्समध्ये शतक झळकावलं. केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि अनुभवी महेंद्र सिंह धोनी सर्वांनी दमदार प्रदर्शन केलंय. दोन अर्धशतक लगावलेला केएल राहुल हा खेळ कायम ठेवून टीममध्ये जागा निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल.
श्रीलंका मोठा फटका बसला जेव्हा एंजेलो मॅथ्य़ूज मांसपेशींच्या त्रासामुळे टीमबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीत उपुल थरंगा आणि सिनिअर खेळाडूंना जबाबदारी स्विकारावी लागेल. गोलंदाज नुवान प्रदीप, तिसारा परेरा आणि मॅथ्यूज फार महागात पडले. त्यामुळे त्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंना मात देण्यासाठी नवी शक्कल लढवावी लागणार आहे.