रफ्तार....! चित्त्याच्या वेगानं धावतो विराट; वेग पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

IND VS PAK Highlights : याच्या पायांमध्ये मशिन आहे का? विराटच्या धावण्याच्या वेग पाहून तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही... कारण विराट ज्या वेगानं धावतो तो आकडा मोठा आहे.    

सायली पाटील | Updated: Sep 12, 2023, 07:39 AM IST
रफ्तार....! चित्त्याच्या वेगानं धावतो विराट; वेग पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही  title=
IND VS PAK highlights Virat Kohli running speed

IND VS PAK Highlights : भारतीय क्रिकेट संघानं नुकत्याच झालेल्या आशिया चषकातील सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली. रिझर्व्ह डे ला पार पडलेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी क्रिकेटप्रेमींची मनं जिंकून गेली. यामध्ये विराट कोहलीची शतकी खेळी विशेष चर्चेचा विषय ठरली. के.एल. राहुल आणि विराटनं भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यांवर घेत शतक झळकावलं आणि नवे विक्रम रचले. त्यातच विराटनं केलेली फटकेबाजी आणि त्याच्या बॅटमधून निघालेले शॉट पाहताना भल्याभल्यांनी थक्क झाल्याचीच प्रतिक्रिया व्यक्त केली. 

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा आणि स्वबळावर मोठा झालेला खेळाडू अशीच विराटची ओळख. मैदानावर त्याच्या चपळ खेळानं सगळेच प्रभावित होतात. विराटची जीवनशैली, त्याच्या आहाराच्या सवयी, व्यायाम हे सगळंच अनेकांना प्रेरणा देणारं. असा हा विराट त्याच्या वेगासाठीही कायमच चर्चेचा विषय ठरतो. 

22 यार्ड्सच्या पीचवर विराट नेमका किती वेगानं धावतो, Fielding करताना त्याचा वेग नेमका काय असतो असा प्रश्न क्रिकेट जाणकार आणि या खेळाबाबत कुतूहल असणाऱ्या प्रत्येकालाच पडतो. किंबहुना तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल. याचं उत्तर माहितीये? 

वेगवान विराट 

विराट मैदानावर असणारे खळगे शोधून तिथं फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. विकेट्समध्ये धावण्यातील त्याची चपळताही इथं मिटत नाही. जिथं एका धावेची शक्यता असते तिथं विराट दोन धावा सहज काढतो आणि अशक्य वाटणाऱ्या तीन धावाही तो तितक्याच सहजपणे धावून पूर्ण करतो. विकेट्समध्ये धावताना विराटचा वेग असतो ताशी 31 किमी. 

आशिया चषकातील सुपर 4 मध्येसुद्धा तो याच वेगानं खेळपट्टीवर अधिपत्य गाजवताना दिसला. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात तर विराटच्या अप्रतिम खेळाची झलक सर्वांनाच पाहता आली. जिथं त्याच्या धावण्याचा वेग ताशी 31 किमी राहिला. 

माहीसुद्धा कमी नाही... 

तिथं विराटच्या वेगाची चर्चा होत असतानाच त्याच्यासोबत मैदान गाजवणारा आणि कमालीचा ताळमेळ साधणारा महेंद्रसिंह धोनीसुद्धा चर्चेत येतो. 2017 मध्ये माहिचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला. तो व्हिडीओ होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा. जिथं धोनी सरासरी 31 किमी ताशी वेगानं धावताना दिसला होता. धाव घेणं असो किंवा मग विकेस्टच्या मागं उभं राहून क्षणात खेळाडूला बाद करणं असो. वेगाच्या बाबतीत माहीसुद्धा कमी नाही हेच खरं. 

हेसुद्धा वाचा : हेल्मेट न घालून शायनिंग मारायला गेला अन्.., PAK vs IND सामन्यात मोठी दुर्घटना; पाहा Video

 

धावांचा डोंगर... 

विराटनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात 94 चेंडूंवर 122 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या खेळीमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. राहुलनंही सामन्यात बिनबाद 111 धावा केल्या. ज्यामुळं या दोन्ही खेळाडूंच्या शतकांच्या बळावर भारतीय संघानं पाकिस्तानपुढं 357 धावांचा डोंगर उभा केला.