मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताची सुरुवात वाईट झाली आणि पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारताचा तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. 31 ऑक्टोबरला भारताचा सामना किवी संघाशी होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सोपा असणार नाही, कारण न्यूझीलंड संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी
उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण इतिहासाची पाने उलटली तर लक्षात येईल की, टी-२० विश्वचषकात भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडसोबत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. 2007 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमधील पहिला सामना खेळला गेला होता, जेव्हा न्यूझीलंड संघाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. शेवटच्या वेळी 2016 च्या विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते, तेव्हा भारतीय संघाला 47 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
31 ऑक्टोबरला भारताला न्यूझीलंडला कोणत्याही किंमतीत हरवायचे आहे, कारण उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक सामना गमावला आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा चुरशीची होणार आहे. भारताला सुवर्ण संधी आहे टीम इंडियाला किवी संघाला हरवून इतिहास बदलायचा आहे.
न्यूझीलंडला हरवून पाकिस्तानने भारताचे काम सोपे केले आहे. न्यूझीलंडवर मात करताच भारताचे काम सोपे होईल. त्यानंतर त्याला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियासारख्या कमकुवत संघांविरुद्ध सामने खेळावे लागतील. कमकुवत संघांविरुद्धचे पुढील 3 सामने जिंकून भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. गटातील प्रत्येक संघाला 5 सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान संघ आपले पाचही सामने जिंकू शकतो. त्याचबरोबर भारत आपले 4 सामने जिंकू शकतो. भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.
31 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. पुढील फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. विराट कोहलीच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, अन्यथा भारत टी-20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. अशा स्थितीत भारताला हा सामना जिंकून जबरदस्त पुनरागमन करायचे आहे.