Ranchi Test Hindi Nahi Aati Comment Viral Video: रांचीमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरने गाजवला. ऑफ स्पिनर असलेल्या बाशीरने सलग 31 ओव्हर गोलंदाजी केली. बाशीरने 84 धावांच्या मोबदल्यात 4 भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवल्याने दुसऱ्या दिवसाअखेरीस इंग्लंडला भारतावर वर्चस्व मिळवता आलं. याच शोएब बशीरचा मैदानावरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
झालं असं की, भन्नाट गोलंदाजीने सामन्यावर प्रभाव सोडण्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना शोएब बशीर जवळच सरफराज खान फिल्डींग करत उभा होता. सामन्यातील 103 व्या ओव्हरला ऑली रॉबिन्सन बाद झाल्यानंतर शोएब बशीर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला होता. शोएब बशीर फलंदाजीसाठी तयार होत असता सरफराजने त्याला हिंदी येत नसेल असं म्हटलं. शोएब बशीरला हिंदी येत नाही यावर सरफराजला ठाम विश्वास होता. त्याने तसं बोलूनही दाखवलं.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्टम्प माईकमध्ये सरफराजने केलेली कमेंट आणि त्यावर शोएब बशीरने दिलेला रिप्लाय रेकॉर्ड झाला आहे. सरफराजने, 'इसको हिंदी भी नहीं आती है बढ़िया चलो,' असं म्हटलं. यावर शोएब बशीर काही बोलेल असं सरफराजला वाटलं नव्हतं. मात्र सरफराजचं हे विधान ऐकून फलंदाजीसाठी तयार होणाऱ्या शोएब बशीरने रिप्लाय केला. सरफराजला आश्चर्याचा धक्का देत शोएब बशीरने त्याला हिंदीमध्येच रिप्लाय करत, 'थोड़ी-थोड़ी आती है हिंदी' असं म्हटलं. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शोएब बशीर केवळ 2 चेंडूंसाठी टिकला. त्याच ओव्हरमध्ये तो रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र मैदानात घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र खरं.
Sarfaraz Khan - isko to Hindi nahi aati hain (he doesn't know Hindi).
Shoaib Bashir - Thodi thodi aati hain Hindi (I know a bit of Hindi).@BCCI #INDvsENGTest #SarfarazKhan pic.twitter.com/TRI0esZHYQ
— Cric Crazy (@CHANCHA55457263) February 24, 2024
शोएब बशीरने भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीमध्ये गुंडाळल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या 7 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या शोएब बशीरने अनुभवी फिरकी गोलंदाजालाही जमणार नाही अशी भन्नाट गोलंदाजी केली. खेळपट्टीला दुसऱ्याच दिवशी मोठ्या भेगा पडण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे चेंडू उसळीच घेत नसल्याचं दिसून आलं. याचा पूर्ण फायदा शोएब बशीरने घेतला. त्याने योग्य लेंथला गोलंदाजी करत भारताच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडलं. भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिललाही शोएब बशीरनेच बाद केलं. जैस्वाल 117 बॉलमध्ये 73 धावांवर तर गिल 65 बॉलमध्ये 38 धावा करुन बाद झाला. शोएब बशीरने रजत पाटीदार आणि रवींद्र जडेजालाही बाद केलं.