बर्मिंघम : बांगलादेशचा २८ रननी पराभव करून टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने ठेवलेल्या ३१५ रनचा पाठलाग करताना बांगलादेशचा २८६ रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला ३ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.
All smiles for India as they secure qualification to the semi-finals #CWC19 | #BANvIND pic.twitter.com/urrRjxeO8t
— Cricket World Cup (@cricketworldcup)
July 2, 2019
बांगलादेशकडून शाकीब अल हसनने सर्वाधिक ६६ रन केले, तर मोहम्मद सैफुद्दीनने नाबाद ५१ रनची खेळी केली. बांगलादेशच्या बहुतेक बॅट्समननी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तमीम इक्बालने २२ रन, सौम्य सरकारने ३३ रन, मुश्फीकुर रहीमने २४ रन, लिटन दासने, २२ रन आणि शब्बीर रहमानने ३६ रन केले.
या पराभवासोबतच बांगलादेशचं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे. तर वर्ल्ड कप इतिहासात टीम इंडियाचा सहाव्यांदा सेमी फायनलमध्ये प्रवेश झाला आहे.
या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेऊन बांगलादेशला ३१५ रनचं आव्हान दिलं. ५० ओव्हरमध्ये टीम इंडियाला ३१४/९ पर्यंत मजल मारता आली.
रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही ओपनरनी टीम इंडियाला २९ ओव्हरमध्ये १८० रनपर्यंत पोहोचवलं. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतलं २६वं तर या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावलं. ९२ बॉलमध्ये १०४ रन करून रोहित आऊट झाला, तर केएल राहुलने ७७ रनची खेळी केली.
रोहित आणि राहुलची विकेट गेल्यानंतर मात्र भारताची बॅटिंग गडगडली. ऋषभ पंतने ४१ बॉलमध्ये ४८ रन केले, तर धोनीने ३३ बॉलमध्ये ३५ रनची खेळी केली. मागच्या लागोपाठ ५ मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या विराट कोहलीला या मॅचमध्ये २६ रन करता आले. तर हार्दिक पांड्या शून्य रनवर आऊट झाला. केदार जाधवच्याऐवजी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला ८ रन करता आले.
बांगलादेशकडून मुस्तफिझुर रहमानने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. शाकीब अल हसन, रुबेल हुसेन आणि सौम्य सरकारला प्रत्येकी १ विकेट मिळाली.