Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी केलेल्या कामगिरीमुळे भारताला मोठा विजय प्राप्त झाला. दरम्यान भारताने सामना जिंकला असला तरी रवींद्र जाडेजाला मात्र आयीसीसीने (ICC) दंड ठोठावला आहे.
रवींद्र जाडेजाने मैदानावरील पंचांना न कळवता बोटावर वेदना कमी करणारं क्रीम लावल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला असून त्याला डिमेरिट पॉइंटही दिला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजाने मोहम्मद सिराजकडून क्रीम घेऊन आपल्याला बोटावर लावलं होतं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने मोठा वाद निर्माण केला होता. जाडेजावर अप्रत्यक्षपणे बॉल टॅम्परिंगचा आरोप होत होता. मात्र आयसीसीने ही क्रीम वैद्यकीय कारणांमुळे वापरली असल्याचं स्पष्ट केलं होतं.
“रवींद्र जडेजाने खेळाडू आणि खेळाडू सहकारी कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.20 चे उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. हे वर्तन खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे,” असं ICC ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे.
“त्याने लावलेलं क्रीम पूर्णपणे वैद्यकीय हेतूंसाठी होतं यावर मॅच रेफ्रींचं एकमत झालं आहे. बॉलवर कोणताही कृत्रिम पदार्थ म्हणून क्रीम लावण्यात आलेलं नव्हतं. यामुळे बॉलच्या स्थितीत कोणताही बदल झाला नव्हता. अन्यथा हे वर्तन कलम 41.3 च्या उल्लंघन करणारं ठरलं असतं," असाही उल्लेख वेसबाईटवर आहे.
रवींद्र जाडेजाने गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेतलं आणि ते आपल्या बोटावर चोळलं होतं. ही गोष्ट नेमकी काय होती हे त्या व्हिडीओत दिसत नव्हतं. पण जाडेजा ती गोष्ट बोटाला लावताना स्पष्ट दिसत होतं.
ऑस्ट्रेलियामधील स्थानिक प्रसारमाध्यम foxsports.com.au ने यावर एक रिपोर्ट तयार केला होता. इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक मायकल वॉननेही (Michel Vaughan) याने "फिरकीसाठी वापरणाऱ्या आपल्या बोटावर जाडेजा काय लावत आहे? याआधी असं काही पाहिलेलं नाही", असं ट्वीट केलं होतं. तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने (Tim Paine) या व्हिडीओवर व्यक्त होताना "Interesting" अशी कमेंट केली होती.