दुबई : T20 वर्ल्डकप 2021 आता शेवटच्या फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठीचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. पण सर्वांच्या नजरा ग्रुप 2 मधील उरलेल्या सामन्याकडे लागल्या आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवलं तर भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग खुला होऊ शकतो.
मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे जर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ड्रॉ झाला तर काय होईल. आणि असं झाल्यास भारताच्या सेमीफायनलच्या प्रवेशावर काय फरक पडेल.
अबुधाबीचे हवामान पाहता पाऊस पडणं अशक्य आहे. तसंच, अमर्यादित सुपर ओव्हरच्या नियमामुळे सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता नाही. मात्र, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला गुणांचं विभाजन करावं लागले तर न्यूझीलंडचे सात गुण होती आणि त्यानंतर त्यांचा सेमीफायनलचा मार्ग सोपा होईल. आणि 7 गुण मिळवणं भारतासाठी अशक्यच होईल.
न्यूझीलंड जिंकल्यास उपांत्य फेरीचे दरवाजे भारतासाठी बंद होतील कारण न्यूझीलंडचे आठ गुण होतील आणि शेवटचा सामना जिंकूनही भारताला तितके गुण मिळवता येणार नाहीत. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास त्यांच्या माफक आशा कायम राहतील तर भारताच्या संधी मजबूत असतील, ज्यांना शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. न्यूझीलंड जिंकल्यास भारताचा नामिबियाविरुद्धचा शेवटचा साखळी सामना ही औपचारिकता राहील.