मॅच सुरू असताना क्रिकेटपटूला कोरोना झाला तर... आयसीसीचे नवे नियम जाणून घ्या

कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

Updated: Jun 11, 2020, 07:44 PM IST
मॅच सुरू असताना क्रिकेटपटूला कोरोना झाला तर... आयसीसीचे नवे नियम जाणून घ्या title=

दुबई : कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने दिलेले प्रस्ताव आयसीसीने स्वीकारले आहेत. 

बॉलवर लाळ, थुंकी लावायला बंदी

खेळाडूंना बॉल चमकवण्यासाठी त्यावर लाळ किंवा थुंकी लावता येणार नाही. बॉलला लाळ किंवा थुंकी लावली तर खेळाडूंना दोनवेळा ताकीद देण्यात येईल. यानंतरही खेळाडू पुन्हा असं करताना आढळले, तर ५ रनची पेनल्टी देण्यात येईल. बॉलला थुंकी लावल्याचं अंपायरच्या लक्षात आलं तर अंपायर तो बॉल पहिले स्वच्छ करतील, मगच खेळाला सुरूवात होईल.

कोव्हिड-१९ सबस्टिट्यूट

टेस्ट मॅच सुरू असतानाच एखाद्या खेळाडूला कोरोना झाला, तर त्याऐवजी सबस्टिट्यूट म्हणून दुसऱ्या खेळाडूला परवानगी देण्यात येईल. हा खेळाडू बदली खेळाडूच्याऐवजी बॅटिंग/बॉलिंगही करू शकेल. हा नियम फक्त टेस्ट मॅचसाठीच लागू असेल. वनडे आणि टी-२०साठी कोव्हिड-१९ सबस्टिट्यूट मिळणार नाही. कोव्हिड-१९ सबस्टिट्यूट हा बॅट्समनच्या बदल्यात बॅट्समन आणि बॉलरच्या बदल्यात बॉलरच असेल. कोव्हिड-१९ सबस्टिट्यूटला मॅच रेफ्री मान्यता देईल. 

कोव्हिड-१९ सबस्टिट्यूटसोबतच कनकशन सबस्टिट्यूटचा नियमही आधीप्रमाणेच लागू असेल. मॅच सुरू असताना खेळाडूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर कनकशन सबस्टिट्यूटचा नियम आयसीसीने मागच्यावर्षी आणला. या नियमामुळे जखमी खेळाडूच्या बदली दुसरा खेळाडू खेळवता येऊ शकतो.

त्रयस्थ अंपायर

आंतरराष्ट्रीय मॅचसाठी त्रयस्थ अंपायर ठेवण्याचा नियम आयसीसीकडून तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे प्रवासाच्या अडचणी लक्षात घेता त्रयस्थ अंपायरचा नियम रद्द करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. आयसीसीच्या एलीट पॅनलमधले स्थानिक अंपायरच आंतरराष्ट्रीय मॅचसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये मैदानातले दोन्ही अंपायर आणि वनडेमध्ये मैदानातला एक अंपायर त्रयस्थ असतो. 

डीआरएस

त्रयस्थ अंपायर नसल्यामुळे आयसीसीने डीआरएसच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. अंपायरच्या कमी अनुभवामुळे आता प्रत्येक टीमसाठी प्रत्येक इनिंगमध्ये आणखी एक अयशस्वी डीआरएस वाढवण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक टीमला टेस्टच्या एका इनिंगमध्ये ३ अयशस्वी डीआरएस आणि वनडे, टी-२०मध्ये २ अयशस्वी डीआरएस घेता येतील.

कोरोना व्हायरसमुळे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या सीरिज स्थगित करण्यात आल्या आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या सीरिजपासून पुन्हा एकदा क्रिकेटला सुरूवात होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजची टीम इंग्लंडमध्ये दाखलही झाली आहे.