दुबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या स्पर्धेची 14 नोव्हेंबरला सांगता झाली. न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया विश्व विजेता ठरला. या वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन पूर्ण होत नाही, तोवर आयसीसीने ऑस्ट्रेलियाला आणि एकूणच क्रिकेट विश्वाला आनंदाची बातमी दिली आहे. आयसीसीने (ICC) आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या वर्ल्ड कपची (T20 World Cup 2022) घोषणा केली आहे. (icc announced 7 host cities have been for Men s T20 World Cup 2022 in Australia)
या वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान हा ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे. तसंच एकूण 7 शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यासह अंतिम सामना कुठे खेळवण्यात येणार याबबातची माहितीही दिली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड अर्थात एमसीजीमध्ये हा महामुकबला खेळवण्यात येणार आहे.
स्पर्धा केव्हापासून कधीपर्यंत?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 चं आयोजन हे 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आलं आहे. एडिलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या 7 शहरांमध्ये एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत.
सेमी फायनल आणि फायनल केव्हा?
अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे. तर 9 आणि 10 नोव्हेंबरला पहिला आणि दुसरा सेमी फायनल सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांचं आयोजन सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि एडिलेड ओव्हलवर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सर्व सामने हे रात्री खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सुपर 12 साठी पात्र 8 संघ
आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सुपर 12 मध्ये पोहचलेले 8 संघांची घोषणा केली आहे. यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. तर श्रीलंका आणि वेस्टइंडिजला राउंड 1 च्या माध्यामतून सुपर 12 मध्ये येण्याची संधी मिळेल.
राऊंड 1 मध्ये नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्टइंडिज या संघामध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत. अजून 4 संघांची घोषणा व्हायची आहे, जे राऊंड 1 मधील संघांसोबत खेळणार आहेत.
पूर्ण वेळापत्रक केव्हा?
या टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या स्पर्धेच्या सेमी फायनल आणि फायनल मॅचचं ठिकाण आणि तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र स्पर्धेतं संपूर्ण वेळापत्रक अजून आलेलं नाही. या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक हे जानेवारी 2022 मध्ये करण्यात येणार आहे.