नवी दिल्ली : ब-याच महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाला टीम इंडियात संधी मिळाली आहे. टीमच्या निवड समितीने त्याला टी-२० सीरिजसाठी टीम इंडियात जागा दिलीय.
टीम इंडियात जागा मिळाल्याने आनंदी झालेल्या सुरेश रैनाने आपल्या मनात दडलेलं बोलून दाखवलं आहे. रैना म्हणाला की, चांगलं प्रदर्शन करत असूनही टीम इंडियातून बाहेर करण्यात आल्याने तो खूप दु:खी झाला होता. पण आता पुन्हा संधी मिळाल्याने याचा संधीचा पूर्ण फायदा उचलण्याच्या तो तयारीत आहे.
रैना म्हणाला की, ‘मी दु:खी झालो होतो कारण मी चांगला खेळत असतानाही मला बाहेर करण्यात आलं होतं. पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे आणि मला फिट वाटत आहे. इतक्या महिन्यांच्या कठिण ट्रेनिंग दरम्यान माझी भारतासाठी खेळण्याची इच्छा आणखी मजबूत झाली आहे’.
तो पुढे म्हणाला की, ‘गोष्ट इतकीच नाहीये. मला भारतासाठी जितकं जमेल तितकं खेळायचं आहे. मला २०१९ वर्ल्ड कप खेळायचा आहे. कारण मला माहीत आहे की, मी इंग्लंडमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. माझ्यात आणखीही क्रिकेट शिल्लक आहे. आणि साऊथ आफ्रिकेत मी तीन सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन करणार याचा विश्वास आहे’.
३१ वर्षीय रैनाला साऊथ आफ्रिके विरूद्ध टी-२० सीरिजसाठी टीममध्ये जागा दिली आहे. रैनाला स्वत:ला सिद्ध करणे तसे सोपे नाहीये. कारण साऊथ आफ्रिकेचे गोलंदाज गिरव्या गवताच्या पिचवर बाउंसर टाकून रैनाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील.