Suryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यानच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने केली. या माहिन्यामध्येच होणाऱ्या या मालिकेपासून भारतीय क्रिकेटमधील एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ परदेश दौरा करणार आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडण्यात आलेल्या संघावर गंभीरचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. टी-20 साठी निवडण्यात आलेल्या संघाचं कर्णधारपद तर सर्वांनाच धक्का देमारं ठरलं. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र घडलं काहीतरी वेगळच!
हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार करण्यात आलं. हार्दिकला उपकर्णधारपदही दिलेलं नाही. हार्दिक पांड्याच्या प्रकृतीसंदर्भातील समस्या हे त्याची उपकर्णधारपदावरुनही उचलबांगडी होण्यामागील सर्वात मोठं कारण मानलं जात असतानाच आता एक वेगळीच माहिती समोर येत आहे. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, संघातील खेळाडूंना हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादववर अधिक विश्वास असल्याने सूर्यकुमारच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे.
'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, खेळाडूंकडून बीसीसीआयने फिडबॅक घेतला होता. या फिडबॅकमध्ये खेळाडूंनी 'सूर्यकुमार यादववर हार्दिक पांड्यापेक्षा अधिक विश्वास आहे,' असं मत नोंदवलं. खेळाडूंनी सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली खेळण्यास अधिक प्राधान्य असेल असंही कळवलं. यानंतर यावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची तब्बल दोन दिवस बैठक सुरु होती. ही बैठक सामान्य बैठकीप्रमाणे नव्हती. या बैठकीमध्ये अनेक मतभेद झाले. बैठकीत चांगलाच वाद, राडा आणि बाचाबाची झाली. अनेक खेळाडूंना थेट कॉल करण्यात आले. हे असे खेळाडू होते ते बीसीसीआयच्या लाँग टर्म प्लॅनचा भाग आहेत. म्हणजेच जे दिर्घकाळासाठी संघात असतील आणि ज्यांचा संघाच्या जडणघडणीमध्ये भविष्यात महत्त्वाचा वाटा असेल त्या खेळाडूंची मतं जाणून घेण्यात आली.
नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं
खेळाडूंना मॅनेज करण्याचं सूर्यकुमारचं कौशल्य हे हार्दिकपेक्षा सरस असल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीला पटलं. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान इशान किशान दौरा अर्धवट सोडून परतणार होता त्यावेळेस सूर्यकुमारनेच त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला त्यामध्ये यश आल्याचं समोर आलं होतं. सूर्यकुमार हा समोरुन अनेक खेळाडूंशी संवाद साधायला जातो. सूर्यकुमारच्या पथ्यावर पडलेली गोष्ट म्हणजे त्याची संवाद साधण्याची शैली रोहित शर्मासारखीच असल्याचं निवड समितीचं म्हणणं पडलं. सूर्यकुमार यादवबरोबर चर्चा करताना खेळाडूंना अवघडल्यासारखं होतं नाही. याच कारणामुळे सूर्यकुमार यादवला हार्दिकपेक्षा अधिक पसंती देत त्याची निवड करण्यात आली.
नक्की वाचा >> गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात
हार्दिक पंड्या हा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भन्नाट गोलंदाजी करत सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. हार्दिकला कर्णधारपदच नाही तर उपकर्णधारपदही मिळणार नाही यासंदर्भातील माहिती निवड समितीचे अध्यक्ष असलेल्या अजित आगरकर आणि गौतम गंभीरने दिली. 2019 साली झालेल्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. मात्र स्पर्धेच्या मध्यातच तो जायबंदी झाल्याने त्याने स्पर्धा अर्ध्यात सोडली. शुभमन गिलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी हार्दिक पांड्याला वगळून इतर पर्याय शोधण्यासाठी गौतम गंभीर आणि निवड समिती उत्सुक असल्याचं स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा >> सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का
हार्दिक पंड्या अनेकदा जखमी झाल्याने ही गोष्टही कर्णधार आणि उपकर्णधारपदाची निवड करताना त्याच्याविरोधात गेली. हार्दिकने 1 जानेवारी 2022 पासून भारताने खेळलेल्या 79 अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांपैकी केवळ 46 सामने खेळला आहे. याच कालावधीमध्ये सूर्यकुमारने हाताच्या बोटावर मोजता येईल इतके सामने मुकला आहे. ते सुद्धा हार्नियाची शस्रक्रीया झाल्याने तो हे सामने मुकला. भारतीय संघाने सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्धची नोव्हेंबरमध्ये झालेली टी-20 मालिका 4-1 ने जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-1 च्या बरोबरीत सुटली.