AUS vs NED: तो आला आणि त्याने...; पराभवानंतर स्कॉट एडवर्ड्सने सांगितलं नेमकी कुठे झाली चूक!

AUS vs NED: ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने मॅचनंतर ग्लेन मॅक्सवेलच्या इनिंगवर मोठं वक्तव्य केलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 26, 2023, 07:31 AM IST
AUS vs NED: तो आला आणि त्याने...; पराभवानंतर स्कॉट एडवर्ड्सने सांगितलं नेमकी कुठे झाली चूक! title=

AUS vs NED: बुधवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना रंगला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने 399 रन्सचा डोंगर उभा केला. अखेरीस नेदरलँड्सची टीम 90 रन्समध्ये गारद झाली. यावेळी 309 रन्सने ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय झाला. या पराभवानंतरही नेदरलँड्स टीमचा कर्णधार आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला. 

काय म्हणाला स्कॉट एडवर्ड्स?

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने मॅचनंतर ग्लेन मॅक्सवेलच्या इनिंगवर मोठं वक्तव्य केलंय. यावेळी स्कॉट म्हणाला, “ऑस्ट्रेलिया एक उत्तम संघ आहे. या सामन्यात आम्हाला अजून चांगलं व्हायला हवं होतं. याचं संपूर्ण श्रेय ऑस्ट्रेलियन संघाला जातं. 

फलंदाजीमध्ये मॅक्सवेल पुढे सरकत होता आणि आम्ही त्याला रोखू शकलो नाही. या ठिकाणी खूप चांगली विकेट आहे आणि बॉल देखील खूप वेगाने फिरतो. टॉप ऑर्डर फलंदाज गेल्या 18 महिन्यांपासून आमच्यासाठी अप्रतिम कामगिरी करतायत आणि म्हणूनच आम्ही याठिकाणी आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देतो, असंही स्कॉटने सांगितलंय.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 399 रन्स केले. या सामन्याच ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने 104 रन्सची खेळी खेळली. तर ग्लेन मॅक्सवेलने 44 बॉल्समध्ये 106 रन्सची तुफानी खेळी करत सामन्याचा रंग बदलून टाकला. 

400 रन्सच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडची टीम केवळ 90 धावांवरच गारद झाली. नेदरलँड्सकडून एकाही फलंदाजाला 30 रन्सचा पल्ला गाठता आला नाही. टीमकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक म्हणजेच 25 रन्स केले. 

दरम्यान या पराभवामुळे नेदरलँडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. बांगलादेश आणि नेदरलँड हे संघ स्पर्धेत फक्त सामन्यापुरता उरले आहेत. या स्पर्धेमध्ये दुसरं चौथ्या स्थानासाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये चुरस दिसत आहे. 

ग्लेम मॅक्सवेलची तुफान फलंदाजी

ऑस्ट्रेलियाचा तडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकलंय. मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये वादळी शतक झळकावलं. यामध्ये त्याने 9 फोर तर 6 सिक्स ठोकलेत.  त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने 399 धावांचा डोंगर उभारला अन् नेदरलँडसमोर 400 धावांचं आव्हान ठेवलं