२०१९ टीम इंडियाच्या या खेळाडूंसाठी ठरलं अखेरचं वर्ष?

२०१९ हे वर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे.

Updated: Dec 26, 2019, 07:27 PM IST
२०१९ टीम इंडियाच्या या खेळाडूंसाठी ठरलं अखेरचं वर्ष? title=

मुंबई : २०१९ हे वर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाने या वर्षामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंसाठी हे वर्ष सर्वोत्तम ठरलं असलं तरी काही भारतीय खेळाडूंनी मात्र निराशा केली. २०१९ हे वर्ष या खेळाडूंसाठी शेवटचं होतं का? पुन्हा हे खेळाडू टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिनेश कार्तिक

तामीळनाडूच्या दिनेश कार्तिकने भारताकडून पहिली वनडे २००९ साली खेळली. कार्तिक हा धोनीपेक्षाही वरिष्ठ खेळाडू आहे. कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकिर्द धोनीच्या आधीच सुरू झाली. पण कार्तिकच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आले. २०१७-१८ साली कार्तिकने टीम इंडियामध्ये त्याची जागा पक्की केली.

मार्च २०१८ साली बांगलादेशविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. यानंतर दिनेश कार्तिक टीम इंडियामध्ये फिनिशरची भूमिका बजावू लागला. २०१९ सालात मात्र कार्तिकची कामगिरी निराशाजनक राहिली. या वर्षी ८ वनडे मॅचमध्ये त्याने २२.२५ च्या सरासरीने ८९ रन केले.

कार्तिकने १५ वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं. वर्ल्ड कपच्या ३ मॅचमध्ये कार्तिकला १४ रनच करता आल्या. आता कार्तिक टीमबाहेर आहे. कार्तिकऐवजी ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे विकेट कीपर आहेत.

अंबाती रायुडू

अंबाती रायुडूने ५५ वनडे मॅचमध्ये ४७.०५ च्या सरासरीने ६९४ रन केले आहेत. रायुडूचे हे आकडे बघून तो टीम इंडियामध्ये का नाही? असा प्रश्न पडणं स्वाभावीक आहे. २०१८ मध्ये रायुडूची कामगिरी चांगली झाली. कर्णधार विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रायुडू हा चौथ्या क्रमांकासाठी योग्य बॅट्समन असल्याचं म्हणलं. पण २०१९ उजाडल्यानंतर रायुडूची कामगिरी ढासळायला लागली.

रायुडूने २०१९ मध्ये ३०.८७ च्या सरासरीने २४७ रन केले. वर्ल्ड कपच्या टीममध्येही रायुडूला स्थान मिळालं नाही. यानंतर रायुडूने निवृत्तीची घोषणा केली, पण ४ महिन्यांनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय फिरवला आणि क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. आता रायुडूची टीम इंडियामध्ये पुन्हा निवड होणं कठीण दिसतंय.

विजय शंकर

२०१९ या वर्षाची सुरुवात विजय शंकरसाठी आनंदाची ठरली. याचवर्षी विजय शंकरने त्याची पहिली वनडे मॅच खेळली. २६ वर्षांच्या विजय शंकरने १८ जानेवारी २०१९ ला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या ४ महिन्यांमध्येच शंकर वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवडला गेला. एवढच नाही तर त्याने चौथ्या क्रमांकावर बॅटिंगही केली.

विजय शंकरचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण तर झालं, पण ३ मॅचमध्येच शंकरला दुखापत झाली आणि तो पुढे खेळू शकला नाही. अजूनही विजय शंकरचं टीममध्ये पुनरागमन झालेलं नाही. पण विजय शंकरचं वय बघता त्याला पुन्हा एकदा टीममध्ये परतण्याची संधी आहे.

एमएस धोनी

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या धोनीसाठी हे वर्ष वेदनादायक ठरलं. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये गेलेला धोनी आजपर्यंत मैदानात परतलेला नाही. २०२० मध्ये धोनी ३९ वर्षांचा होईल, त्यामुळे धोनी पुन्हा भारतीय टीमच्या जर्सीमध्ये दिसेल का, हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय.