नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं या दोन्ही खेळाडूंबाबत निर्णय घेण्यासाठी लोकपाल नियुक्त करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण ऍमिकस क्युरी म्हणून (न्यायमित्र) पीएस नरसिम्हा जेव्हा पद सांभाळतील तेव्हाच याप्रकरणाची सुनावणी करु असं, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सांगितलं. न्यायमूर्ती एसए बोबडे आणि एएम सप्रे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
वरिष्ठ अधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी याप्रकरणी ऍमिकस क्युरी (न्यायमित्र) बनण्यासाठी दिलेली सहमती मागे घेतली तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं नरसिम्हा यांची ऍमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयानं स्वत: या प्रकरणासाठी लोकपालची नियुक्ती करावी कारण या दोन्ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची कारकिर्द पणाला लागली आहे, असा युक्तीवाद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे वकिल पराग त्रिपाठी यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी एक आठवड्यापर्यंत स्थगित केली आहे.
बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकारी पीटीआयला म्हणाला ''आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि आधीच ऍमिकस क्युरीच्या एक आठवड्यानंतर पद सांभाळण्याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे प्रशासकीय समितीचे प्रमुख लोकपाल नियुक्त करू शकत नाहीत. असा लोकपाल नियुक्त केला तर तो कोर्टाचा अवमान होईल.''
नरसिम्हा ऍमिकस क्युरी म्हणून जेव्हा पद सांभाळतील तेव्हाच लोकपालच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकतो. ऍमिकस क्युरीच्या पदावर आल्यानंतर जर पीएस नरसिम्हा यांना याप्रकरणाची सुनावणी लवकर होण्यासाठी आणि खेळाडूंच्या क्रिकेट खेळण्याला लवकर सुरुवात व्हावी, यासाठी लोकपालची गरज असल्याचं वाटलं, तरच लोकपालची नियुक्ती होईल, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हार्दिक पांड्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. याप्रकरणी बीसीसीआयनं दोन्ही खेळाडूंचं चौकशी होईपर्यंत निलंबन करण्याचा निर्णय घेतला. निलंबन झाल्यामुळे दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतावं लागलं. बीसीसीआयनं या दोन्ही खेळाडूंना कारणे दाखवा नोटीसही बजावली. यानंतर दोन्ही खेळाडूंनी बिनशर्त माफी मागितली.