GT vs MI : नूरच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज चक्काचूर; 55 रन्सने गुजरातचा विजय

मुंबईच्या अखेरच्या फलंदाजांनी काही मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सामना जिंकवून देता आला नाही. मुंबईचा हा यंदाच्या सिझनमधील चौथा पराभव होता. 

Updated: Apr 25, 2023, 11:36 PM IST
GT vs MI : नूरच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज चक्काचूर; 55 रन्सने गुजरातचा विजय title=

GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेर गुजरातचा विजय झाला आहे. गुजरातने मुंबईचा 55 रन्सने पराभव केलाय. मुंबईच्या अखेरच्या फलंदाजांनी काही मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सामना जिंकवून देता आला नाही. मुंबईचा हा यंदाच्या सिझनमधील चौथा पराभव होता.

मुंबईची टॉप ऑर्डर गडगडली

208 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात उतरले. यावेळी दोन्ही ओपनर्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र हार्दिक पंड्याच्या जाळ्यात रोहित शर्मा फसला आणि अवघ्या 2 रन्सवर माघारी परतला. इशान किशनने देखील 21 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी करत चाहत्यांची निराशा केली. 

त्यानंतर कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही अधिक वेळ क्रीजवर थांबता आलं नाही. सूर्यकुमार 23 तर ग्रीन 33 रन्सवर माघारी गेले. तिलक वर्मा अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला. आजच्या या सामन्यात टॉप ऑर्डर्सच्या फलंदाजांपेक्षा इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गुजरातकडून नूर अहमदने 3 विकेट्स काढल्या.  

नेहल वढेराची फटकेबाजी व्यर्थ

आजच्या सामन्यात मुंबईच्या टॉप ऑर्डरनचे फलंदाज फेल गेलेले दिसले. यावेळी नेहल वढेरा 7 व्या नंबरवर फलंदाजीला आला आणि त्याने काही मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. वढेराने 21 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीत 3 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. वढेरा सोबत पियुष चावलानेही काही मोठे शॉट्स मारले. 

अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदा केली आयपीएलमध्ये फलंदाजी

मुंबई कठीण परिस्थितीत असताना आज अर्जुनला देखील फलंदाजीसाठी उतरावं लागलं. त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने एक उत्तुंग सिक्स देखील लगावला.

मुंबईसमोर 208 रन्सचं आव्हान

मुंबईने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. गुजरात तब्बल 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 207 रन्स केले होते. आयपीएलच्या इतिहासातील गुजरात टायटन्सची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये 94 रन्स ठोकले. गुजरातकडून पुन्हा एकदा शुभमन गिलची बॅट तळपली. शुभमनने आजच्या सामन्यात सर्वाधिक म्हणजेच 56 रन्स केले. त्यानंतर डेव्हिड मिलरने 46 आणि अभिनव मनोहरने 42 रन्स केल्या. तर पुन्हा एकदा कर्णधार हार्दिक पंड्या फेल गेलेला दिसला.