आयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग

नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Updated: Jul 24, 2018, 09:34 PM IST
आयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग title=

मेलबर्न : नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आयपीएलदरम्यान भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांना मी मैदानात होणाऱ्या संशयास्पद गोष्टींची कल्पना दिल्याचंही मॅक्सवेल म्हणाला. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलभोवती संशयाचे ढग गोळा होऊ लागले आहेत. अल जजीरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर ग्लेन मॅक्सवेलवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप होत आहेत. या आरोपांमुळे मी हैराण झाल्याचं मॅक्सवेल म्हणाला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाईटनं याबद्दलची बातमी दिली आहे. पण मॅक्सवेल कोणत्या आयपीएल दरम्यानच्या संशयास्पद गोष्टींबद्दल बोलला याबाबत स्पष्टीकरण मिळालेलं नाही. 

अल जजीरानं काही दिवसांपूर्वी स्पॉट फिक्सिंगबद्दलची एक डॉक्यूमेंट्री बनवली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. २०१७ साली रांचीमध्ये झालेल्या टेस्ट मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचं या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं. याच टेस्ट मॅचमधून मॅक्सवेलनं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. या मॅचमध्ये मॅक्सवेलनं पहिलं शतक झळकावलं होतं.

अल जजीराच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये मॅक्सवेलचं नाव घेण्यात आलेलं नाही पण मॅच फूटेडमुळे मॅक्सवेलवर संशय घेण्यात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही मॅक्सवेलला या डॉक्यूमेंट्रीच्या प्रसारणाची माहिती दिली. पण भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी याबाबत माझी चौकशी केली नाही, असं मॅक्सवेल म्हणाला.

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर मी हैराण झालो आणि मला दु:खही झालं. ज्या खेळामुळे आपल्याला ओळख मिळाली त्यामुळेच आपल्यावर आरोप होत असतील तर दु:ख होणं स्वाभावीक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यावर शतक केलेला क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मी स्टिव्ह स्मिथला मिठी मारली होती, असं मॅक्सवेल एसईएन रेडियोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. माझ्यावर लागलेले आरोप निराशाजनकर आहेत. यामध्ये कोणतंही तथ्य नाही. हे आरोप १०० टक्के चूक आहेत, अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलनं दिली.