मुंबई : वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलवर विंडीज क्रिकेट संघटनेनं नवी भूमिका सोपवली आहे. विश्वचषकामध्ये गेल हा विंडीजच्या संघाचा उपकर्णधार असणार आहे. कर्णधार जेसन होल्डरला तो सहाय्य करणार आहे. ख्रिस गेलच्या कारकीर्दीतील हा पाचवा विश्वचषक असून त्यानं २८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजारांहून अधिक धावा कुटल्या आहेत. जुलै २०१८नंतर फेब्रुवारी २०१९मध्ये गेलनं संघात पुनरागमन केलं.
याआधी गेलने २०१० मध्ये वेस्टइंडीज टीमचं नेतृत्व केलं होतं. ३९ वर्षाच्या गेलचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल अशी चर्चा आहे. गेलने म्हटलं की, 'वेस्टइंडीज टीमचं प्रतिनिधीत्व करणं नेहमीच सन्मानाची गोष्ट असते. हा वर्ल्डकप माझ्यासाठी खास आहे. सिनिअर खेळाडू म्हणून मी कर्णधाराला मदत करेल. संघाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.'
आयर्लंडमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेमध्ये वेस्ट इंडिजने विकेटकीपर शाई होपला वेस्टइंडीजचा उपकर्णधार केलं आहे. गेल सध्या आयपीएलमध्ये खेळतो आहे. पण पंजाब टीमचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. ३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये वेस्टइंडीजचा पहिला सामना १ जूनला पाकिस्तान विरोधात रंगणार आहे.