नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने 195 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. अखेरच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती आणि हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका निभावली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की हार्दिक असा फलंदाज आहे जो कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो.
माजी भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्यासारखा फलंदाज म्हणून गंभीरने हार्दिकचे वर्णन केले. गंभीर म्हणाला की, 'हे दोन्ही फलंदाज पूर्वी टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका निभावत असत, हार्दिकमध्ये आज तितकीच क्षमता आहे. हार्दिकचा खेळ कायम राहिल्यास अखेरच्या ओव्हरमध्ये तो 20 ते 25 धावा करून भारताला जिंकवू शकतो.'
एका इंग्रजी वेबसाईटवर बोलताना गंभीर म्हणाला की, "हार्दिक पांड्यासारखे मोजकेच खेळाडू आहेत, त्याआधी भारताकडे युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी होते. ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल आहे. ते कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतात. यासाठी ते सक्षम आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 20 ते 25 धावांची गरज भासली तरी हे खेळाडू आपल्याला आत्मविश्वास देतात की ते हे साध्य करू शकतात."
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, "मला स्कोअर बोर्ड फिरताना पाहणे आवडते. यामुळे कळतं तुम्हाला कोणता शॉट खेळायचा आहे आणि तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत. मी बर्याचदा या परिस्थितीत आलो आहे. मी भूतकाळातील चुकांमधून शिकलो आहे. माझा खेळ नेहमी माझ्या आत्मविश्वासामुळेच असतो. मी तो नेहमीच पार पाडतो. मला माझ्यावर विश्वास आहे. त्याला अति आत्मविश्वास ही मानले जाऊ शकते. "