'रोहित शर्मा आणि विराट कोहली फार चुकीच्या...', प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असणाऱ्या गौतम गंभीरला इशारा, 'जर तुला...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रशिक्षकपदासाठी त्याची मुलाखत झाली असून, त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची जास्त शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 19, 2024, 03:56 PM IST
'रोहित शर्मा आणि विराट कोहली फार चुकीच्या...', प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असणाऱ्या गौतम गंभीरला इशारा, 'जर तुला...' title=

टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघात आता मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचं कारण आता राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जागा घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गौतम गंभीर पहिल्या क्रमांकावर असून त्याची मुलाखतही पार पडली आहे. गौतम गंभीर भारतीय संघाच्या यशस्वी खेळाडूंपैकी आहे जो 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय वर्ल्डकप संघाचा भाग होता. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये कोलकाताचं नेतृत्व करताना 2012 आणि 2014 मध्ये स्पर्धा जिंकली होती. तसंच यावर्षी मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा ही कामगरी करुन दाखवली आहे. 

गौतम गंभीरने यावर्षी कोलकाता संघाला मिळवून दिलेल्या यशानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी त्याचं नाव चर्चेत आलं होतं. गौतम गंभीर याच्याव्यतिरिक्त व्ही व्ही रमन हेदेखील स्पर्धेत असून प्रशिक्षकपदासाठी त्यांचीही मुलाखत पार पडली आहे. रिपोर्टनुसार, T20 विश्वचषकाच्या अखेरीस अधिकृत घोषणा केली जाईल आणि पुढील मुख्य प्रशिक्षकाचा झिम्बाब्वे T20I दौऱ्यापासून कार्यकाळ सुरू होईल.

जर प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड झाली तर त्याच्यासमोर नेमकी काय आव्हानं असतील आणि संघ कोणत्या दिशेने जाऊ शकतो यावर आकाश चोप्राने भाष्य केलं आहे. "गौतम गंभीरने मुलाखत दिली आहे. त्याची मुलाखत व्हर्च्यूअली घेण्यात आली असं समजत आहे. दुसरीकडे व्ही व्ही रमन यांनी फार उत्तम सादरीकरण केलं आहे. मी आताच हे वाचलं. गौतम गंभीर या स्पर्धेत अग्रस्थानी आहे. प्रत्येक ठिकाणी हे बोललं जात आहे आणि आम्हाला हे समजलं आहे," असं आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं.

तसंच त्याने यावेळी भारतीय क्रिकेटमधील बदल गौतम गंभीरसाठी फार आव्हानात्मक ठरेल अशी शक्यता वर्तवली आहे. याचं कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासारख्या अनेक खेळाडू सेटअपमध्ये 30 पेक्षा जास्त वयाचे आहेत.

"भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता असल्याने ते फार सोपं जाणार नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, कदाचित रवींद्र जडेजा यांची टी-20 मध्ये मोलाची भूमिका असून ते चुकीच्या 30, 35 आणि 37 बाजूला आहेत. यामध्ये आर अश्विनचाही समावेस आहे," असं तो म्हणाला आहे. 

गौतम गंभीर आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जात असून, आपल्या धाडसी निर्णयांसाठी ओळखला जातो. जर गौतम  गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला तर 2027 वर्ल्डकप त्याच्यासाठी एक मोठं आव्हान असेल. "पुढील तीन ते चार वर्षांत, जेव्हा 2027 विश्वचषक येईल, तेव्हा तुम्हाला तुमचा संघ त्यासाठी तयार करावा लागेल. याशिवाय 2027 मध्ये WTC आणि 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये T20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा रोडमॅप तयार करावा लागेल," असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.