World Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल

Gautam Gambhir Reaction: विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 12, 2023, 10:26 AM IST
World Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल title=

Gautam Gambhir Reaction: बुधवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने अफगाणिस्तानचा पराभव केला. परंतु या सामन्यात सर्वांना प्रतिक्षा होती विराट कोहली ( Virat Kohli ) आणि नवीन उल हक ( Naveen-Ul-Haq ) यांच्यातील वाकयुद्धाची. या सामन्यात विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

विराट-नवीन यांच्यातील वाद मिटला

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यातील सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli ) आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. मात्र अखेर या वादाला पूर्णविराम लागला आहे. IPL 2023 मध्ये कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) आणि नवीन लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा भाग होता आणि गौतम गंभीर हा LSG चा मेंटॉर होता. 

आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यात कोहली ( Virat Kohli ) आणि नवीन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हात मिळवताना देखील वातावरण पुन्हा एकदा तापलं होतं. यावेळी नवीनने कोहलीचा हात झटकला होता. त्या दरम्यान एलएसजीचा मेंटर गौतम गंभीरही या वादात उतरला होता. यानंतर हा वादाला मोठं रूप मिळालं.

दोघांमध्येही झाली मैत्री

IPL 2023 मध्ये झालेल्या जोरदार वादानंतर आता वर्ल्डकप 2023 च्या अफगाणिस्तान-भारत सामन्यादरम्यान विराट-नवीन मैत्री झालेली पाहायला मिळाली. फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने ( Virat Kohli ) नवीन उल हकच्या गोलंदाजीचा सामना केला. याचवेळी दोघांमध्ये मैत्री झाली. स्टेडियममध्ये बसलेले कोहलीचे चाहते नवीनला डिवचत होते. यानंतर कोहलीने हातवारे करत चाहत्यांना असं न करण्यास सांगितलं. काही वेळाने दोन्ही खेळाडू एकमेकांशी हात मिळवला आणि हसताना आणि एकमेकांशी बोलताना दिसले. याबाबत गौतम गंभीरनेही आपले मत व्यक्त केलंय.

नवीन-विराटच्या मैत्रीवर काय म्हणाला गंभीर

नवीन आणि विराटच्या या मैत्रीवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिलीये. कमेंट्री करताना गौतम म्हणाला, 'एखादा वाद मैदानामध्ये होतो, बाहेर नाही. प्रत्येक खेळाडूला त्याच्या टीमसाठी आणि विजयासाठी लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणत्या देशाचे किंवा कोणत्या स्तराचे खेळाडू आहात हे महत्त्वाचे नाही. आज आपण पाहिलेली एक चांगली गोष्ट म्हणजे कोहली आणि नवीन यांच्यातील लढत आता संपली आहे. 

गंभीर पुढे म्हणाला की, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सोशल मीडियावर कोणत्याही खेळाडूला ट्रोल करणं किंवा चुकीच्या पद्धतीने लक्ष्य बनवणं योग्य नाही. नवीन प्रथमच आयपीएलमध्ये खेळला हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. तो अफगाणिस्तानसाठी खेळतो ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.