लंडन : श्रालंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा याची मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) अध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तो एमसीसीचा आतापर्यंतचा पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष ठरला आहे. बुधवारी या पदासाठी त्याची नियुक्ती झाल्याची घोषणार करण्यात आली. ऑक्टोबर महिन्याच्या १ तारखेला तो या पदाचा कार्यभार सांभाळणार आहे. एमसीसीचे अध्यक्ष अँटनी व्रेफर्ड यांनी लॉर्ड्स मैदानावर घेण्यात आलेल्या एमसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याविषयीची घोषणा केली.
एमसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही आपल्यासाठी अत्यंत सन्मानजनक बाब असल्याचं म्हणत संगकाराने आनंद व्यक्त केला. 'एमसीसीचा भावी अध्यक्ष म्हणून माझ्या नावाची निवड केली जाणं ही खूप मोठी आणि आदराची गोष्ट आहे. या पदावर काम करण्यासाठी मी आशावादी आहे. क्रिकेट विश्वातील योगदान आणि या संपूर्ण क्षेत्रातील कामगिरी पाहता माझ्यासाठी एमसीसी हा जगातील एक उत्तम क्रिकेट क्लब आहे', असं तो म्हणाला. २०२० हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी एक मोठं वर्ष ठरणार आहे. त्यातही लॉर्ड्सची महत्त्वाची भूमिका ठरेल. शिवाय सपोर्टींग स्टाफचाच एक भाग असणाऱ्या संगकाराने आपल्या या पदाच्या निमित्ताने या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठीची उत्सुकता व्यक्त केली.
लॉर्ड्सशी असणारं संगकाराचं हे नातं काही नवं नाही. २०१४ पासून तो या क्रिकेटच्या पंढरीशी जोडला हेला आहे. २०१४ मध्ये इंग्लंडविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यातील १४७ धावांची खेळी आणि इंग्लंडविरोधातच श्रीलंकेच्या एकदिवसीय ऐतिहासिक विजयातील त्याची ११२ धावांची खेळी या त्याच्या सर्वात लोकप्रिय खेळी ठरल्या होत्या.
'एमसीसी सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय योगदान आणि क्रिकेट क्लबच्या कक्षा रुंदावण्याला भर देत आहे. त्याच धर्तीवर संगकाराने भावी अध्यक्षपदासाठीच्या आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याचा मला आनंदच आहे', असं अँटनी व्रेफर्जड म्हणाले. एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून संगकाराची स्तुती करत तो येत्या काळात क्रिकेच क्लबच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रभावी कामिगिरी करेल अशी अपेक्षाही त्यांनी अधिकृत पत्रकातून व्यक्त केली. दरम्यान, संगकारा ऑक्टोबर महिन्यात एमसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहे, त्याचा हा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल.