Former Indian Spin Legend Death: भारतामध्ये वर्ल्ड कप 2023 चं आयोजन करण्यात आलेलं असून सध्या देशातील मोहोल क्रिकेटमय आहे. असं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. 1970 च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता. बिशन सिंग बेदींबरोबरच इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांचा या सर्वोत्तम 4 फिरकीपटूंमध्ये समावेश होता.
बिशन सिंग बेदींचा जन्म 25 सप्टेंबर 1946 अमृतसरमध्ये झाला. ते डाव्या हाताने उत्तम फिरकी गोलंदाजी करायचे. भारतीय कसोटी क्रिकेट संघात बिशन सिंग बेदी 1966 ते 1979 दरम्यान खेळले. बिनश सिंग बेदींनी 22 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स घेतल्या. आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कार्किर्दीमध्ये त्यांनी 1560 विकेट्स घेतल्या. बिशन सिंग बेदी भारतासाठी 10 एकदिवसीय सामनेही खेळले. त्यांनी आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय क्रिकेट विश्वावर छाप सोडली.
1977-78 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये बेदींच्या नेतृत्वाखाली 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया कडवी झुंज दिली. ही मालिका बॉब शिम्पसन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 3-2 च्या फरकाने जिंकली. या मालिकेमधील मेलबर्न आणि सिडनी कसोटी बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकत यजमान संघाला घाम फोडला होता. शेवटची आणि पाचवी निर्णायक कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिका 3-2 ने खिशात घातली.
बिशन सिंग बेदी यांनी भारताने जिंकलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्येही मोलाची कामगिरी केली होती. त्यांनी आपल्या 12 ओव्हरच्या स्पेलमध्ये 6 निर्धाव ओव्हर टाकल्या आणि केवळ 8 रन दिले होते. त्यांनी एक विकेटही घेतली होती. 1975 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये बिशन सिंग बेदींच्या या कामगिरीमुळे पूर्व आफ्रिका संघाला 120 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं होतं. भारताने हा सामना जिंकला होता.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बिशन सिंग बेदींचं निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये, "भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. भारतीय क्रिकेटचं फार मोठं नुकसान झालेलं आहे," असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Union Sports Minister Anurag Thakur says "Former captain of Indian Cricket team, Bishan Singh Bedi is no more. This is a huge loss for cricket..." pic.twitter.com/saBGd878G0
— ANI (@ANI) October 23, 2023
बिशन सिंग बेदींनी इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन या तिघांच्या मदतीने भारतीय फिरकी गोलंदाजीला नवीन ओळख मिळवून दिली. भारतीय फिरकी गोलंदाजांची ही भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिली प्रभावी फळी होती असंही क्रिकेट क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.