बांगलादेशविरोधातील (Bangladesh) पहिल्या टी-20 सामन्यात (T-20) भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने फक्त 16 चेंडूत 39 धावा ठोकल्या. तसंच 26 धावा देत 1 विकेट मिळवली. पहिल्या टी-20 सामन्यातील विजयात हार्दिक पांड्याला मोलाचा वाटा आहे. पहिल्या सामन्यात तो सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर क्रिकेट चाहते खूश झाले असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मात्र भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंगने हार्दिक पांड्याच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी बांगलादेश योग्य संघ नसल्याचं म्हटलं आहे.
"बांगलादेश संघाविरोधातील खेळीच्या आधारे एखाद्याच्या फॉर्मचा अंदाज लावणं माझ्या मते योग्य नाही. ज्याप्रकारे ते खेळत आहेत, ते पाहता ही काही सर्वोच्च स्तरावर खेळत नाही आहेत," असं आरपी सिंगने जिओ सिनेमाशी संवाद साधताना सांगितलं.
पुढे तो म्हणाला की, "हार्दिकने चांगली कामगिरी केली. तो अशी कामगिरी करण्यास सक्षम आहे. पण अशा दुर्बळ संघाविरोधातील त्याच्या कामगिरीचा आधार घेणं माझ्या मते योग्य नाही. हीच कामगिरी तुम्ही एखाद्या चांगल्या संघाविरोधात केली तर चर्चा करता येईल".
हार्दिक पांड्याने जबरदस्त फलंदाजी करण्यासह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने आपल्या चारही ओव्हर्स पूर्ण केल्याकडे आरपी सिंगकडे लक्ष वेधलं. बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण केला ही संघासाठी सकारात्मक गोष्ट आहे असं आरपी सिंग म्हणाला.
“हार्दिक पांड्या चारही षटकं टाकली ही चांगली बाब आहे. तो आपला गोलंदाजीचा कोटा पूर्ण करू शकतो की नाही असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात होता. पण आता तो चांगली कामगिरी करत आहे. त्याची फलंदाजी नेहमीच चांगली होती. जिथे त्याच्या गोलंदाजी आणि फिटनेसमध्ये सुधारणा झाली आहे. केवळ बांगलादेश संघाविरोधातील त्याची कामगिरी पाहून आपण उत्साहित होण्याचं कारण नाही. अजून बऱ्याच खऱ्या चाचण्या बाकी आहेत,” असं तो पुढे म्हणाला.