नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात बॉल लागल्याने फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाल्याची घटना अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, आता असाच एक प्रकार फुटबॉल मैदनात घडला आहे. रविवारी फुटबॉल मच दरम्यान क्रोएशियाच्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
या मॅचमध्ये ज्यावेळी खेळाडू गोल करण्याचा प्रयत्न करत होते त्याच दरम्यान २५ वर्षीय ब्रुनोला बॉल लागला. बॉल लागल्यानंतर काही सेकंदांतच तो मैदानात कोसळला.
ब्रुनो याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं बोललं जात आहे. क्रोएशियाचा ब्रुनो हा खेळाडू बोबन मारसोनियाच्या टीमकडून खेळत होता. रविवारी मारसोनिया आणि स्लावोनियाज पोजेगा यांच्यात सुरु असलेल्या मॅच दरम्यान हा प्रकार घडला.
मॅच सुरु असताना २५ वर्षीय ब्रुनो मैदानात अचानक कोसळला. त्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. तसेच तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मैदानात आलेल्या मेडिकल टीमने ४० मिनिटांपर्यंत ब्रुनोला शुद्धीत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आलं नाही. ब्रुनोचा मैदानातच दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक मैदानात झालेल्या या घटनेमुळे दोन्ही टीम्सला मोठा धक्का बसला आहे. इतकचं नाही तर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही अश्रु अनावर झाले.
सोमवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालात ब्रुनोचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं म्हटलं आहे. ब्रुनोच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना आणि टीमला एक मोठा धक्का बसला आहे. थर्ड डिव्हिजन लीगमध्ये त्याने १२ गोल केले होते.
यापूर्वी वेल्सेमध्ये याचवर्षी प्रोफेशनल फुटबॉलर मिचेल जोसेफ मॅच दरम्यान कोसळला होता. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान जोसेफचा मृत्यू झाला.