सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १३७ रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. चौथ्या टेस्टला सुरुवात ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरुवात होईल. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर ही सीरिज २-२नं बरोबरीत सुटेल. ही सीरिज जरी बरोबरीत सुटली तरी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडेच राहिल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावानं संबोधलं जातं. जर सीरिज ड्रॉ झाली तर ट्रॉपी कुणाला द्यायची याबद्दल नियम बनवण्यात आले आहेत.
बॉर्डर-गावसकर सीरिज ड्रॉ झाली तर मागच्यावेळी ज्या टीमनं सीरिज जिंकली त्यांना ट्रॉफी देण्यात येते. २०१७ साली भारताच्या दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलियाचा टेस्ट सीरिजमध्ये २-१नं पराभव झाला होता, त्यामुळे ही ट्रॉफी भारताला मिळाली होती. आता या सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये पराभव झाला तरी ट्रॉफी भारताकडे कायम राहिल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. यानंतर पर्थमध्ये झालेली दुसरी टेस्ट मॅच भारतानं गमावली. तिसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा जोरदार पुनरागमन करत भारतानं ऑस्ट्रेलियाला १३७ रननी नमवलं. आता चौथ्या टेस्टमध्ये विजय झाला तर भारत सीरिजही खिशात टाकेल. तसंच ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिलाच सीरिज विजय असेल.
ऍलन बॉर्डर आणि सुनील गावसकर या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचं भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला नाव देण्यात आलं. २०व्या शतकात टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन करणारे हे दोनच खेळाडू होते.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात १९९६-९७ साली झाली. दिल्लीत झालेल्या एकमेव टेस्टमध्ये सचिनच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटनी पराभव केला होता. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियात १९४७-१९९६ मध्ये ५० टेस्ट झाल्या होत्या. यातल्या ऑस्ट्रेलियानं २४ आणि भारतानं ८ जिंकल्या होत्या, तर १ मॅच टाय आणि १७ मॅच ड्रॉ झाल्या होत्या.
१९९६-९७ पासून आत्तापर्यंत १३ वेळा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिज खेळवण्यात आली. यातल्या ७ सीरिजमध्ये भारताचा आणि ५ सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. तर २००३-०४ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेली सीरिज ड्रॉ झाली होती. त्या सीरिजमध्ये भारतानं १ आणि ऑस्ट्रेलियानं १ टेस्ट जिंकली, तर २ टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या.