World Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ

जिद्द, चिकाटी आणि साजेसा खेळ...

Updated: Jul 16, 2019, 01:24 PM IST
World Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच क्रिकेट विश्वचषकाची दणक्यात संगता झाली. एका अतिशय उक्तंठा वाढवणाऱ्या सामन्याने या स्पर्धेचा शेवट झाला. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून गणल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर हा सामना खेळला गेला. सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु होती. पर्यायी, अतिशय तुल्यबळ लढतीचा अनुभव क्रीडारसिकांना मिळाला. 

निर्धारित ५० षटकांच्या खेळात हा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यानंतर तो थेट सुपर ओव्हरपर्यंत गेला. त्या शेवटच्या षटकातही विजयी मोहोर उमटवण्यासाठी दोन्ही संघांमधील खेळाचा थरार पाहता आला. अखेर सुपर ओव्हरही अनिर्णित असल्याचं भासताच या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाहून जास्त चौकार मारल्यामुळे इंग्लंडला यंदाच्या हंगामातील विश्वविजेता संघ म्हणून घोषित करण्यात आलं. 

एकिकडे यजमानांनीच विश्वचषकावर नाव कोरत एक नवा इतिहास प्रस्थापित केला. तर, दुसरीकडे या सामन्याच पराभव स्वीकारणाऱ्या न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंना आणि त्यांच्या अफलातून खेळालाही क्रीडारसिकांनी दाद दिली. केन विलियमसनचा त्याच्या संघातील खेळाडूंवर असणारा विश्वास असो किंवा किवींच्या संघाला बाद करण्यासाठी गोलंदाजीचा मारा करणारा इंग्लंडचा खेळाडू जोफ्रा आर्चर असो. विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यातील प्रत्येक क्षण हा तितकाच उत्कंठा वाढवणारा होता. 

अंतिम सामन्यातील हाच थरार पाहण्यासाठी सध्या सोशल मीडियावर नेटकरी या सामन्याच्या काही खास क्षणांच्या शोधात आहेत. परिणामी आयसीसीकडून पोस्ट करण्यात आलेला सामन्याला थोडक्यात आणि तितक्याच परिणामकारकपणे मांडणारा एक व्हिडिओ ट्रेंडमध्ये आला आहे. 

दोन्ही संघांची खेळी, सुपरओव्हरचा थरार या व्हिडिओमध्ये पाहता येत आहे. त्यामुळे एका अर्थी विश्वचषक स्पर्धा होऊन आता दोन दिवस उलटले असले तरीही क्रिकेटची आणि पर्यायी यंदाच्या विश्वचषकाची हवा मात्र ओसरलेली नाही, असंच म्हणावं लागेल.