लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये भारताची बॅटिंग पुन्हा गडगडली. इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गननं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या बॉलरनीही मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला आणि भारतीय टीमला ५० ओव्हरमध्ये २५६/८ वर रोखलं. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्माला या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा २ रनवर आऊट झाला. तर शिखर धवन ४४ रनवर रन आऊट झाला. कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक ७१ रन केल्या. तर धोनीनं ६६ बॉलमध्ये ४२ रन केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीदनं १० ओव्हरमध्ये ४९ रन देऊन ३ विकेट घेतल्या. डेव्हिड विलीला ९ ओव्हरमध्ये ४० रन देऊन ३ विकेट मिळाल्या.
दुसऱ्या वनडे प्रमाणेच तिसऱ्या वनडेमध्येही भारताची बॅटिंग पुन्हा गडगडली. २०१९ सालचा वर्ल्ड इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळे भारतीय बॅट्समनची ही कामगिरी कोहली आणि निवड समितीची चिंता वाढवणारी आहे. या मॅचमध्ये के.एल.राहुलऐवजी भारतानं कार्तिकला संधी दिली होती. पण कार्तिकलाही या मॅचमध्ये छाप पाडता आली नाही. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार ही अडचण अजूनही कायम आहे.
पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाल्यामुळे सीरिज १-१नं बरोबरीत आहे. या सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वनडे लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. ही मॅच जो जिंकेल त्याच्या खिशात सीरिजही जाईल.