मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्याच दरम्यान IPLमध्ये कोरोना घुसला. 29 सामने खेळून झाल्यानंतर कोरोनामुळे उर्वरित 31 सामने तात्पुरते स्थगित करण्याची वेळ आली. अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा IPL नियोजित करण्यासंदर्भात BCCIची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी होणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंड सीरिज लवकर संपवण्यात यावी यासाठी इंग्लंड बोर्डकडे बीसीसीआय विनंती करणार आहे.
इंग्लंड बोर्डनं आयपीएल आणि इंग्लंड सीरिजवर मोठा खुलासा करत स्पष्टीकरण दिलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही सीरिज नियोजित वेळेनुसारच होईल त्यामध्ये IPL2021मुळे कोणताही बदल केला जाणार नाही असंही इंग्लंड बोर्डनं स्पष्टीकरण दिलं आहे.
सध्या तरी सीरिजमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही अशी भूमिका इंग्लंड बोर्डनं घेतली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजनंतर देखील इंग्लंडचे खेळाडू खूप जास्त व्यस्त असणार आहेत. त्यांचे निश्चित दौरे देखील आहेत. त्यामुळे आता IPLमध्ये याचा अडथळा होणार की नाही हे पाहावं लागणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावर्षी इंग्लंडचे वेळापत्रक खूप व्यस्त असल्याने त्यांना टी -20 वर्ल्ड कपमध्ये भाग घ्यावा लागेल आणि त्यानंतर एशेज मालिका आहे. इंग्लंड बोर्डचे अधिकारी म्हणाले की, 'आमचे व्यस्त वेळापत्रक आहे. सप्टेंबरमध्ये पाचवी कसोटी संपल्यास 19 किंवा 20 सप्टेंबरला बांगलादेशला रवाना व्हावं लागेल. आम्हालाही खेळाडूंना थोडा ब्रेक द्यावा लागतो. आम्हाला आमच्या वेळापत्रकांचे व्यवस्थापन करावे लागेल जेणेकरून टी 20 विश्वचषक आणि एशेजसाठी खेळाडू तयारी करू शकतील.