बीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाला आणि बीसीसीआयचे डोळे खाडकन उघडले.

Updated: Jul 15, 2019, 08:45 PM IST
बीसीसीआयचा धोनीला इशारा, विराटवरही टांगती तलवार title=

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाला आणि बीसीसीआयचे डोळे खाडकन उघडले. या पराभवाला कारणीभूत ठरवत बीसीसीआयनं सर्वात प्रथम महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आणि मग पराभवाच्या कारणांची मीमांसा करणं सुरु झालं. बीसीसीआयनं या पराभवानंतर कठोर पावलं उचलण्याचं ठरवलं असून बीसीसीआयच्या निशाण्यावर जर सर्वात प्रथम कोण असेल तर ते आहेत महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली.

पराभवानंतर आता बीसीसीआय विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्याबाबत विचारत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. २०२३ साली भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपची तयारी आतापासून करण्यासाठी बीसीसीआयनं कंबर कसली असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे विभागून कर्णधारपद सोपवण्याचा विचार सुरू आहे. वनडे क्रिकेटसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याची ही योग्य वेळ असल्याचंही सूत्रांनी म्हटलंय. तर विराट कोहलीकडे टेस्ट आणि टी-२० क्रिकेटचं कर्णधारपद कायम ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीनं भारतीय टीममध्ये आपलं स्थान गृहित धरू नये, असा इशारा बीसीसीआयनं दिल्याची माहिती समोर येत आहे. एका अर्थी बीसीसीआयनं त्याला निवृत्त होण्याचा सल्लाच दिल्याचं मानलं जातं आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद हे लवकरच धोनीशी याबाबतीत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकूणच काय तर धोनी आणि विराटबाबत बीसीसीआय नाराज असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा बीसीसीआयनं पक्का विचार केला आहे. यामुळे आता धोनी बीसीसीआयच्या या दबावासमोर निवृत्ती जाहीर करतो का? आणि विराटला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं जातं का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.