BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. 

Updated: Jan 16, 2022, 07:53 AM IST
BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?  title=

दिल्ली : दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने सर्व चाहत्यांना मोठा धक्का दिला. विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यामुळे सर्वजण नाराज झाले. 

विराट कोहलीला 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. बीसीसीआयसोबतच्या तणावपूर्ण संबंधांनंतर कोहलीने ही घोषणा केली. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपद सोडले होते, तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आलं होतं. 

विराट-बीसीसीआयमध्ये वादविवाद?

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाचं खंडन केलं होतं.  त्याच्या म्हणण्याप्रमाणे, मला टी-20 टीमचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं गेलं नाही. मात्र यांनंतर मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी मात्र कोहलीचं हे वक्तव्य फेटाळून लावलं होतं.

अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेकडून मालिका 1-2 ने मालिका गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने ट्विट केलं की, "प्रत्येकाला एका टप्प्यावर येऊन थांबावं लागतं आणि भारतीय कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी हाच टप्पा आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले पण प्रयत्नांचा किंवा विश्वासाचा कधीच अभाव नाही राहिला."

विराट कोहलीने पुढे लिहिलंय, 'गेली सात वर्ष सातत्याने मेहनत, प्रयत्न आणि टीमला योग्य दिशेने नेण्याचा निर्धार केला आहे. हे काम मी प्रामाणिकपणे केलं आणि कोणतीही कसर सोडली नाही. मी माझ्या बाजूने 120 टक्के देण्यावर नेहमीच विश्वास ठेवला. माझ्या मनात अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी प्रामाणिक होतो."

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला होता. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही शेवटची मालिका होती, ज्यामध्ये तो तिसऱ्या कसोटीदरम्यान विरोधी कर्णधार डीन एल्गरच्या बाजूने डीआरएसच्या निर्णयानंतर स्टंप माईक घेऊन वादात सापडला होता.